ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 जुलै : गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पाचोऱ्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत काही शंका मी उपस्थित केली होती. तसेच पाचोरा शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगले जात असल्याचे तत्कालीन पीआय अशोक पवार यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तसेच फोनवरून संवाद साधत सांगितले होते. मात्र, त्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. यानंतर पाचोरा बसस्थानक परिसरात गोळीबाराची घटना घडली.
दरम्यान, आता पाचोरा आणि पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशन मध्ये नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून देखील तालुक्यात कुठेही धंद्यांविरोधात कारवाई केली जात नसल्याचा आरोप माजी आमदार दिलीप वाघ यांनी केला आहे. पाचोऱ्यातील त्यांच्या निवासस्थानी भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, माजी पंचायत समिती सदस्या सुभाष पाटील, नाना पाटील, भाजपचे गोविंद शेलार, बन्सी पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, अनिल पाटील, आदींची उपस्थिती होती.
दिलीप वाघ काय म्हणाले? –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केवळ कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे म्हणून पाचोरा येथे पोलीस निरीक्षक तसेच पिंपळगाव (हरे.) येथे नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, दोन्ही अधिकारी नवीन आले असले तरी गेल्या आठ दिवसांपासून काही सर्च झाले असेल. पण त्याठिकाणी अवैध शस्त्रे, पत्ता-सट्टा अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई होताना कुठेही दिसून येत नसल्याचा आरोप माजी आमदार दिलीप वाघ यांनी केला आहे.
पाचोरा शहरातील रहदारीचा मुद्दा –
माजी आमदार दिलीप वाघ यांनी पाचोरा शहरातील रहदारीचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत ते म्हणाले की, पाचोरा शहरातील मुख्य मार्ग म्हणजे कॉलेज परिसरातील महाराणा प्रताप चौक ते जारगाव चौफलीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, याठिकाणी पोलीस थांबत नाहीत. साईमोक्ष मंगल कार्यालयात याठिकाणी पोलीस थांबतात आणि वाहनांची तपासणी करतात. भडगाव रोड अंतुर्ली फाट्याजवळ चार पोलीस उभे असतात; पण जारगाव चौफलीवर पोलीस थांबत नाहीत. नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. असे असताना गुरे मोठ्या प्रमाणात रोडवर आढळून येतात. मात्र, पोलीस प्रशासन किंवा नगरपालिका असेल कुठेही गांभीर्याने लक्ष नसल्याचे आरोप दिलीप वाघ यांनी केला आहे.
अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबविण्याची मागणी –
पाचोरा तालुक्याची गुन्हेगारी ही इतर तालुक्यांच्या तुलनेत वाढली असून अवैध धंद्यामुळेच ही गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप दिलीप वाघ यांनी केलाय. शेवाळ्याचे खून प्रकरण हे देखील अवैध धंद्यांमुळेच झाले असल्याचा दावा दिलीप वाघ यांनी केला. पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्याकडून रात्री दहा-साडेवाजताच शहरातील दुकाने बंद ठेवण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, रात्री 11 वाजेनंतर वाळू वाहतूक तसेच अवैध धंदे केले जातात त्यांच्यावर कारवाईचं काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक यांच्यावतीने अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबविली गेली पाहिजे, अशीही अपेक्षाही दिलीप वाघ यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा-भडगावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव भाजपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 100 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे, या दृष्टीकोनातून आमचे मंडळ अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांकडून नियोजन करण्यात येत आहे. पाचोऱ्यातील छत्रपती संभाजीराजे चौक, भडगावातील पारोळा चौफली, पिंपळगाव (हरे.), नगरदेवळा तसेच कजगाव याठिकाणी हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिलीप वाघ यांनी दिली. दरम्यान, सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन भाजपच्यावतीने दिलीप वाघ यांनी केले.