ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 11 जुलै : पाचोरा शहरात मागील आठवड्यात बसस्थानक परिसरात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. यानंतर पाचोरा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्यात येत होता. दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली करत त्यांच्याजागी चाळीसगाव ग्रामीणचे राहुलकुमार पवार यांना पाचोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवली.
दरम्यान, राहुलकुमार पवार यांनी पदभार हाती घेताच पाचोरा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तात्काळ उपाययोजना करायला सुरूवात केली आहे. यासोबतच त्यांनी आज 11 जुलै रोजी दुपारी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी राहुलकुमार पवार यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच पाचोरा तालुका पोलिसांच्यावतीने शहरासह तालुक्यातील तरूणांना महत्वाचे आवाहन केले आहे.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार काय म्हणाले? –
पाचोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार म्हणाले की, सध्यास्थितीत तरूणांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्राम, व्हाट्सअप तसेच फेसबूकच्या माध्यमातून रील तयार करून ते टॅग करून फॉरवर्ड करण्याचे प्रमाण हे वाढलेले आहेत. तसेच दुसऱ्याला टॅग केल्यामुळे संबंधित व्यक्तीस राग येतो आणि यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कोणत्याही धर्माच्या अथवा समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, असे रील तरूणांनी तयार करू नये. असे रील तयार करून आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पीआय राहुलकुमार पवार यांनी दिलाय. तसेच पाचोरा शहरात रात्री 11 वाजेनंतर विनाकारण शहरात फिरणारे तरूण आढळले तर त्यांच्यावर देखील कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी सांगितले.






