ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 मार्च : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर साथीदारांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली असून आज पाचोऱ्यात युवासेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी युवासेनेने मागणी करत पाचोरा पोलिसांना निवेदन दिले.

पाचोऱ्यात युवासेनेचे निषेध आंदोलन –
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदेंच्या शिवसेनेतील युवासेनेच्या पाचोरा-भडगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्यावतीने वाल्मिक कराड यांचा पुतळा दहन करत संतोष देशमुख हत्याप्रकरणाविरोधात निषेध आंदोलन केले. यावेळी युवासेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी युवासेनेने मागणी केलीय.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, शहरप्रमुख सुमित सावंत, भोला पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहरप्रमुख सुरज शिंदे, अण्णा चौधरी, शहर समन्वयक मयूर महाजन, अल्पसंख्यांक शहर प्रमुख तोसीब शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवा सैनिक उपस्थित होते.