जळगाव, 18 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातील वडनगरी येथे बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 5 ते 11 डिसेंबरदरम्यान शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, या कथेच्या आयोजनाच्या तयारीला वेग आला आहे असून सुमारे 300 एकर शेतात कथेचे नियोजन केले जात आहे.
7 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता –
राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधून सुमारे 7 लाखांहून अधिक भाविक या कथेसाठी येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या कथेच्या आयोजनासाठी आयोजन समितीकडून जोरदार तयारी सुरू असून, वडनगरी गावाच्या फाट्याजवळील 300 एकरची जागा तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे.
अशी असेल व्यवस्था –
आयोजन समितीकडून 30 हून अधिक उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत. राज्यभरासह इतर राज्यांकडून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता, भाविकांसाठी राहण्याची व जेवणाचीही व्यवस्था आयोजकांकडून केली जात आहे. यासाठी यु्द्ध पातळीवर काम सुरू आहे. या कार्यक्रमच्या नियोजनासाठी 7 हजार स्वयंसेवकांच्या पथकांचे आयोजन समितीकडून तयार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आयोजक तुषार चौधरी व जगदीश चौधरी यांनी दिली आहे.
कथेच्या ठिकाणी 7 लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आयोजकांकडून 30 एकर जागेवर दीड लाख भाविकांच्या सकाळच्या व रात्रीच्याही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांकडून सुमारे 40 हजार भाविकांची मुख्य मंडपात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह शौचालय उभारण्याचेही काम सुरू झाले आहे.
5 डिसेंबरपासून कथेस सुरूवात –
पंडित प्रदिप मिश्रा यांच्या वाणीद्वारे शिवमहापुराण कथेचे वाचन 5 ते 11 डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान केले जाणार आहे. प्रदिप मिश्रा यांचे 4 डिसेंबर रोजी कथावाचक जळगाव शहरात आगमग होणार असून, 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन ते वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिरापर्यंत प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.