जळगाव : जळगाव ते पाचोरा दरम्यान, परधाडे गावाजवळ भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला होता. यातील 5 जणांच्या कुटंबीयांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव ते पाचोरा दरम्यान परधाडे जवळ 22 जानेवारीला झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू होता. तसेच या भीषण अपघातात एकूण 10 जण जखमी झाले होते. यानंतर आता या परधाडे अपघातातील 5 मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांची रक्कम प्रशासनाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. संपूर्ण पडताळणी करुनच ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहेत.
पाचोरा ते माहिजी स्थानकामधील परधाडे स्थानकाच्यामागे असलेल्या वडगाव या गावाजवळ लखनऊ ते मुंबई जाणारी पुष्पक एक्सप्रेसमधील जनरल डब्यातील काही प्रवाशांना धूर दिसल्याने त्यांनी डब्याला आगा लागल्याचा संशय व्यक्त केला. अशातच प्रवासी घाबरले असतानाच डब्यातील कोणतरी चैन खेचल्याने ट्रेन थांबवली. यानंतर ट्रेन थांबली असता प्रवाशांनी ट्रेनमधून आजूबाजूने उड्या मारल्या. पुष्पक एक्सप्रेसमधून डब्याला आग लागल्याच्या भीतीने उड्या मारलेले प्रवासी हे विरूद्ध दिशेच्या रूळावर होते. अशातच मुंबईच्या मार्गाने बंगळुरु-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस भरधाव वेगात आली. कर्नाटक एक्सप्रेस ज्या दिशेने येत होती. त्या दिशेने वळण असल्याने ही एक्सप्रेस प्रवाशांना दिसली नाही आणि अशातच त्यांचा ट्रेन खाली येऊन दुर्दैवीपणे मृत्यू झाला होता. कर्नाटक एक्स्प्रेसने रुळांवरील प्रवाशांना चिरडले. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले होते. त्यापैकी 7 जण हे मूळ नेपाळमधील, तर 5 जण हे उत्तर प्रदेशातील रहिवासी होते.
दरम्यान, आता उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या पाचही मयतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने ही मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत जाहीर झालेल्या प्रवाशांमध्ये त्यात शिवकुमार पृथ्वीराज चव्हाण, (40, उत्तर प्रदेश) व महेश गुरदीम (उत्तर प्रदेश), इम्तियाज अली (35, रा. गुरुग्राम, उत्तर प्रदेश), नसिरुद्दीन बहुरद्दीन सिद्दिकी (असिम) (19, रा. गोंडा, उत्तर प्रदेश), बाबू खान (27, रा. कंदोसा, बहराईच, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.