(इरोड) तामिळनाडू, 28 मार्च : लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून विद्यमान खासदारांचे तिकीट कापत नवीन उमेदवारांना संधी देण्यात येत असतानाच तमिळनाडू राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
तमिळनाडूमधील इरोडचे खासदार आणि मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK) पक्षाचे नेते ए गणेशमूर्ती यांचे आज पहाटे कोईम्बतूर येथील एका खासगी रुग्णालयात कथित आत्महत्येच्या प्रयत्नानंतर निधन झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेल्याने ते नैराश्येत गेले होते. या नैराश्यातून त्यांनी विश प्राशन करत आत्मत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
नैराश्येतून उचलेले टोकाचे पाऊल –
ए गणेशमूर्ती हे इरोडमधून तीन वेळा खासदार म्हणून जिंकून आले होते. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार अशी आशा असताना त्यांचे तिकिट कापण्यात आले. यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या नैराश्यातून गणेशमूर्ती यांनी 24 मार्च (रविवार)रोजी टोकाचे पाऊल उचलत इरोड येथील पेरियार नगर येथील राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. ते बेशुद्धावस्थेत आढळून आल्यावर त्यांना कुटुंबीयांनी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर कोईम्बतूर येथील कोवई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल (KMCH) मध्ये गणेशमूर्ती यांना हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
गणेशमूर्ती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इरोड येथील पेरुंडुराई येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी ठेवण्यात येणार आहे. गणेशमूर्ती यांच्या कथित आत्महत्येच्या प्रयत्नाला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा स्थानिक पोलीस तपास करत आहेत. तत्पूर्वी, गणेशमुर्ती यांचे खासदारकीचे तिकिट कापल्याने त्यांना तमिळनाडुत होणाऱ्या 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा विचार केला जाणार होता, अशी माहिती देखील समोर आली आहे.
हेही वाचा : भाजपचं ठरलं मात्र ठाकरे गटाचं काही ठरेना! स्मिता वाघ यांच्याविरोधात जळगावात कुणाला मिळणार संधी?






