चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 14 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प’ या नावाने भाजपने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दरम्यान, भाजपचे संकल्प पत्र सर्व घटकांना सशक्त करणारे, असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? –
भाजपचे संकल्प पत्र प्रसिद्ध जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण देशाला भाजपच्या जाहीरनाम्याची प्रतिक्षा असते. भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेभर भर देण्यात आला असून हा जाहीरनामा युवाशक्ती नारीशक्ती, गरिब, शेतकरी या सर्व घटकांना सशक्त करणारा आहे. भाजपच्या संकल्प पत्रातून युवा भारताची युवा आकांक्षा प्रतिबिंबित होते. आमच्याद्वारे कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
पुढील पाच वर्ष मोफत धान्य –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य मिळणार असल्याची घोषणा केली. तसेच जन औषधी केंद्रावर मिळणाऱ्या औषधींमध्ये 80% सूट दिली जाईल. यासाठी जन औषधी योजनेचा विस्तार केला जाईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी संबोधित करताना सांगितले.
भाजपसाठी समान नागरिक कायदा आवश्यक –
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांवर लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर तत्काळ काम सुरू केले जाईल. याआधीच सरकारने पुढील 100 दिवसांच्या नियोजन केले असून त्यावर काम सुरू केले आहे. देशातील नागरिकांची महत्वकांक्षा हेच मोदीचे मिशन असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपसाठी समान नागरिक कायदा आवश्यक आहे. भाजप वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार असल्याचेही ते यावळी म्हणाले.
हेही वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या एका क्लिकवर ठळक घोषणा