नवी दिल्ली, 28 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाले आहे. मुंबईवरून बारामतीला जाण्यासाठी त्यांचे विमान निघाले होते. दरम्यान, बारामतीत लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या शोक संवेदना –
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातामुळे मन अत्यंत दुःखी झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. या अपार दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबियांना धैर्य आणि बळ मिळावे, अशी प्रार्थना.
अजित पवारजी हे लोकांचे नेते होते आणि त्यांचा जनतेशी मजबूत तळागाळातील संपर्क होता. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी सदैव अग्रभागी राहणारे, कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा मोठा सन्मान होता. प्रशासन विषयक बाबींवरील त्यांचे सखोल आकलन तसेच गरीब व वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ॐ शांती.






