शिर्डी, 25 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, 26 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते उद्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार आहेत. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत.
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. त्यानंतर शिर्डी जवळील काकडी विमानतळालगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करून राष्ट्राला समर्पित करणार आहेत.
तीन मजली दर्शनरांग प्रकल्प –
शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थानने 109 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 19 ऑक्टोबर 2018 रोजी या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. दर्शनरांग प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ 2 लाख 61 हजार 920 चौरस फूट आहे. घडीव दगडाची वातानुकुलीन दर्शन रांग, प्रवेशासाठी 3 भव्य प्रवेशद्वार, एकाचवेळी सुमारे 45 हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था, 48 बायोमेट्रिक पास काऊंटर, 20 लाडू प्रसाद काउंटर, 2 साईंची विभूती काऊंटर, 2 साईंचे कापड कोठी काऊंटर, 2 बुक स्टॉल्स, 10 देणगी कांऊटर, 06 चहा, कॉफी काउंटर व बँग स्कँनर, 25 सेक्युरिटी चेकअप सेंटर, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी 10 हजार क्षमतेचे 12 वातानुकूलीत हॉल, आरओ प्रक्रियेचे शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र अशी या दर्शनरांगेची वैशिष्ट्ये आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 68878 हेक्टर (1 लाख 70 हजार 200 एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील 2612 हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील 66266 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.
काकडी येथील शेतकरी मेळाव्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेते महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रूपयांची मदत मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील 86 लाख शेतकऱ्यांना 1712 कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण केले जाणार आहे.