जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 25 ऑगस्ट रोजी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. लखपती दीदी ‘ प्रशिक्षण मेळाव्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे जळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत.
कुठे असेल कार्यक्रम –
या मेळाव्याच्या निमित्ताने प्राथमिक नियोजनानुसार पंतप्रधान मोदी हे सव्वा दोन तास जळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील विमानतळासमोर असलेल्या मैदानावर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात खान्देशसह बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांचा सहभाग असेल. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे ‘लखपती दीदीं’शी संवाद साधत त्यांना संबोधित करतील.
कोण कोण असेल दौऱ्यात –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीहून सरळ जळगावला येणार आहेत. यानंतर या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर ते नवी दिल्लीकडे रवाना होतील. त्यांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वच प्रशासन आता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत.
कसे असेल नियोजन –
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुरुवातीला जळगाव विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते मेळावास्थळी पोहोचतील. साधारणत: दीड तासांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर ते काही वेळ स्थानिक मंत्री, पदाधिकाऱ्यांना देतील. यानंतर विमानतळाकडे प्रयाण करतील.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे निर्देश –
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याानिमित्त सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे नियोजन करण्याचे निर्देशही सौनिक यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याासंदर्भात ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम मुख्य सचिवांकडे पाठविला जाणार आहे. त्यावर पंतप्रधान कार्यालय शिक्कामोर्तब करणार आहे.
लाभार्थ्यांना नाश्ता आणि जेवणही दिले जाणार –
दरम्यान, या कार्यक्रमासाठी तालुका पातळीवरून येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना नाश्ता पुरविला जाणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा – खासदार सुप्रिया सुळे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर, ‘असे’ आहे कार्यक्रमाचे नियोजन