महाकुंभनगर (प्रयागराज), 30 जानेवारी : उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असताना मोठी बातमी मौनी अमावस्येचे अमृत स्नानाच्या पुर्वीच मोठी बातमी समोर आली. या कुंभमेळ्यात 29 जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. यात किमान 30 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व 13 आखाड्यांनी आज मौनी अमावस्येचे अमृत स्नान रद्द करण्यात आले. तसेच याप्रकरणाची आता न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
महाकुंभात चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू –
प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवार 29 जानेवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले होते. त्या ठिकाणी ब्राह्म मुहूर्तावर एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाले. दरम्यान, मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली असून 5 जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच 36 जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
कुंभमेळ्यात नेमकं काय घडलं? –
प्रयागराज येथील आखाडा परिसरात बॅरिकेड्स लावलेले होते. अनेक भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट बघत घाटावर झोपले होते आणि त्याचवेळी इतर भाविक मोठ्या संख्येने त्याठिकाणी पोहोचले. दरम्यान, पायाखाली कोण झोपले आहे हे ते बघू शकले नाहीत. यामुळे प्रयागराज कुंभमेळा चेंगराचेंगरी प्रकरणाची घडली अशी माहिती महाकुंभचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी माध्यमांना दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून फोनवरून घटनेची माहिती घेतली.
न्यायालयीन चौकशी होणार –
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रयागराजमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आदित्यनाथ यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, बुधवारी पहाटे आखाडा मार्गावरील बॅरिकेड ओलांडून काही भाविक अमृत स्नानासाठी गेले. आखाड्यांच्या अमृतस्नानासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बॅरिकेड ओलांडून आलेल्या भाविकांमुळे गोंधळ निर्माण झाला व त्यातून दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘…तरच मंत्रिपदाचा राजीनामा देईन!’ मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?