नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएचा भाग आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. दरम्यान, याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात एनडीएच्या सुशासनाच्या अजेंड्याला बळकटी देण्यासाठी ते मौल्यवान योगदान देत आहेत, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले.
2023 मध्ये सत्तेत सहभागी –
2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर राज्यात युतीचे सरकार आले आणि या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. मात्र, यानंतर 2023 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप झाला. तो म्हणजे, शिवसेनेसारखी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षात फूट पडली आणि अजित पवार यांनी आपले काका शरद पवारांची साथ सोडत आपल्यासोबत काही मंत्री, आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच अर्थ खातेही त्यांना देण्यात आले. अशा प्रकारे अजित पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएचा भाग झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अजित पवारांचे कौतुक –
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसांच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘श्री. अजित पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात एनडीएच्या सुशासनाच्या अजेंड्याला बळकटी देण्यासाठी ते मौल्यवान योगदान देत आहेत. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही शुभेच्छा –
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि गरीब आणि दलितांना सक्षम करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. जनतेच्या सेवेत त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो.’