पाचोरा, 22 फेब्रवारी : सुवर्ण खान्देशच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या समाजातील वेगवेगळ्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. आगामी काळातही त्यांच्या हातून समाजाचं, परिसराचं आणि राष्ट्राचं अत्यंत चांगल्या प्रकारचं वार्तांकन व्हावं, या शब्दात प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला शुभेच्छा दिल्या.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचा द्वितीय वर्धापन दिनाचा कार्यक्रम काल पाचोरा शहरातील महालपुरे मंगल कार्यालय याठिकाणी संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निवृत्ती गायकवाड हे होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, पाचोरा नायब तहसिलदार विनोद कुमावत, भडगावचे नायब तहसिलदार रमेश देवकर, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य मधुकाटे, पाचोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वीय सहायक मयुर येवले उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत इतर मान्यवरांनीही यावेळी आपली मते मांडली.
काय म्हणाले प्राध्यापक राजेंद्र चिंचोले –
यावेळी कार्यक्रमात बोलताना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले म्हणाले की, कोणत्याही राष्ट्राची संपत्ती ही त्या राष्ट्राचं ज्ञान, त्या राष्ट्राकडे असणारं विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्य असतं. भारतात ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याची कमतरता नाही. पण त्यासाठी योग्य शिक्षण देणं गरजेचं आहे. आपलं शिक्षण हे ज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, ज्ञान हे संस्कारनिष्ठ असलं पाहिजे, संस्कार हे संस्कृतीनिष्ठ असलं पाहिजे, संस्कृती ही विज्ञाननिष्ठ असली पाहिजे, विज्ञान हे राष्ट्रनिष्ठ असलं पाहिजे आणि राष्ट्र हे वस्तुनिष्ठ असलं पाहिजे. जर आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचं असेल तर चांगलं शिक्षण, चांगलं ज्ञान, चांगलं विज्ञान, चांगलं तंत्रज्ञान, चांगल्या कौशल्याची गरज आहे आणि या सर्व गोष्टींना चांगल्या प्रसार माध्यमांची आवश्यकता आहे.
ज्यावेळी प्रसारमाध्यमे हे खऱ्या अर्थाने ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, कौशल्य आणि शिक्षणाचा प्रसार करतील, त्या दिवशी देशाचा विकास झाल्याशिवार राहणार नाही आणि मला खात्री आहे, आपल्या देशात काही न्यूज चॅनेल्स हे चांगल्याप्रकारचं काम करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे सुवर्ण खान्देश. सुवर्ण खान्देशचे चंद्रकांत दुसाने याचा मोठा भाऊ खुशाल दुसाने याला मी लहानपणापासून ओळखतो. लासगावसारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि पत्रकारितेत त्याने अत्यंत चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने ईटीव्ही मराठी असेल ईटीव्ही भारत असेल, आयबीएन लोकमत असेल यामाध्यमातून त्याने अँकरिंग आणि एडिटोरिअल टीममध्ये मोठी भूमिका निभावली आणि हे सर्व करत असताना फक्त राज्यातीलच नाही तर देशातील मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या.
त्याचेच अनुकरण त्याचा लहान भाऊ चंद्रकांत हा करत आहे. त्याने सुवर्ण खान्देशच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या समाजातील वेगवेगळ्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. आगामी काळातही त्यांच्या हातून समाजाचं, परिसराचं आणि राष्ट्राचं अत्यंत चांगल्या प्रकारचं वार्तांकन व्हावं, या शब्दात प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजला शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचा सत्कार लासगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपाल देवसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभार सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी मानले.
यावेळी सुवर्ण खान्देशचे मुख्य संपादक शशिकांत दुसाने, चंद्रकांत दुसाने यांचा लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, पाचोरा पत्रकार संघाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला अपराध नियंत्रण संघटनेच्या पाचोरा टीमच्या वतीने, कल्पेश टीचे जगन्नाथ महाजन, एसएसआर ट्रेडर्सचे रकीब देशमुख सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – ‘समाजाची गरज ओळखून पत्रकारिता करण्याची गरज’, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन