ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 सप्टेंबर : पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने आज सकाळी 10 वाजता बाजार समितीच्या आवारात भव्य शेतकरी मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला हवामान अभ्यासक पंजाबराव डख उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा –
पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन करण्यात आले आहे. या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, बाजार समितीच्या 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पत्रकांचे वाचन करून मंजुरी देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांचा विचार करणे हे कामकाज होणार आहे.
पंजाबराव डख शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन –
पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्त आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून खरीप पिक काढणीची वेळ आलेली असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन, मका तसेच कापूस पीक सुखरूप घरात येण्यासाठी असलेल्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, या मेळाव्यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.