मुंबई. 15 फेब्रुवारी : राजकीय क्षेत्रातून आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजित पवार यांनी जिंकली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा –
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचे वाचन करताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचे हा एकमेव निकष महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला आहे. अजित पवार यांच्याकडे 53 पैकी 41 आमदार आहेत. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे.
सगळेच आमदार पात्र –
राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच असल्याने त्यांचे आमदारही सुरक्षित आहेत. दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद असून त्यामुळे सगळेच पात्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाने बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्त्वाविरोधात काम केले, असे म्हणता येणार नाही, असे यावेळी राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळल्या. तसेच शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.
आमदार अपात्रताप्रकरणी निकाल –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्हींमध्ये संघर्ष सुरू होता तसेच दोनही गटांनी आमदार अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला.
हेही वाचा : राज्यसभा निवडणूक, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर