जळगाव, 26 सप्टेंबर : हवामान विभागाने 24 आणि 25 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. असे असताना जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. तर काही ठिकाणी शेतपीकांचे देखील नुकसाने झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस –
जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याचे पाहायला मिळतंय. सोमवारी पाचोऱ्यासह, भडगाव तसेच जळगाव शहरात जोरदार पाऊस पडल्यानंतर काल मंगळवारी रात्री जिल्ह्यातील पारोळ्यासह, अमळनेर, जामनेर, धरणगाव व एरंडोल या तालुक्यांना परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. तसेच रावेर, जळगाव, चोपडा, यावल, भुसावळ या तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.
शेतीपीकांचे नुकसान –
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे यावल व रावेर येथे वादळी पावसाने पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. 384 शेतकऱ्यांचे 194 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात प्रामुख्याने केळी बागा आहेत. यासोबतच ज्वारी, मका, कापूस आणि तुरीचे पीकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला जात आहे.
जळगावचा पावसाचा अंदाज –
जळगाव जिल्ह्यात आज गुरूवार रोजी देखील दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, २९ सप्टेंबरनंतर जिल्ह्यातून पाऊस रजा घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 709 मिमी पाऊस चार महिन्यांत झाला आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीचा 115 टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच जलसाठ्यांमध्ये चांगला जलसाठा आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट –
राज्यात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबई, पुणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या सर्व जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या जिल्ह्यात आज व उद्या मेघगर्जना व विजांच्या कडकडासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview