जळगाव, 25 डिसेंबर : राज्यातील सर्वत्र भागात मागील दोन आठवड्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात होत्या. मात्र, आता ऐन हिवाळ्यात राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला असून नाशिकसह खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामानाचा अंदाज नेमका काय? –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस नाशिककरिता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उद्या 26 डिसेंबर रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 27 डिसेंबर रोजी धुळे ,नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला,अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गारपीट होण्याची शक्यता –
भारताच्या पश्चिम हिमालयीन प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात पश्चिमी झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असल्याने राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता –
गेल्या काही दिवसांत हवामानात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याची थंडी तर कधी आभ्राछादित वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात कृषीतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हेही पाहा : Suresh Khade Interview: कामगार ते कामगार मंत्री, कसा झाला प्रवास?, माजी मंत्री सुरेश खाडेंसोबत संवाद