जळगाव, 27 जुलै : पावसाने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात अतिमुसळधार पाऊस झाला असताना राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता –
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज काही जिल्ह्यात यलो तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच पुणे व सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने अलर्ट केलेल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नगरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याचा काय आहे हवामान अंदाज –
समुद्रसपाटीवर असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आज सक्रिय आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात आणि पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश लगतच्या किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती