जळगाव, 28 मे : यंदा राज्यात मे महिन्यातच मान्सूनचे आगमन झाले असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दरम्यान, राज्यात आजपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात आजपासून पुढील तीन दिवस पावसाचे –
राज्यात यंदा मान्सूनचे आगमन सुद्धा लवकर झाले असून मे महिन्यातच महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस पडतोय. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आज 28 मे पासून ते 30 मे पर्यंत म्हणजेच पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुसळधार पावसाची शक्यता ही कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यातील विविध भागात काल मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला 28 तसेच 29 मे म्हणजे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, खरीप हंगामाच्या कामाला वेग देण्याची गरज असताना पावसाची स्थिती निर्माण झाल्याने पेरणीपुर्व कामे खोळंबल्याचे चित्र दिसून येत आहे.
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा आणि भरपाई देण्याचे आदेश –
गेल्या दोन-तीन दिवसात राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा काल मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तसेच राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.