मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 17 एप्रिल : चोपडा सायकलिस्ट ग्रुप यांचे तर्फे आयोजित राज्यस्तरीय वाचनवेडा सायकलिस्ट पुरस्कार 2025 हा आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा, चिंचला तालुका सुरगाणा जि. नाशिक येथील प्राध्यापक राजेंद्र बापू खैरनार यांना प्रदान करण्यात आला.
सायकलिंग संस्कृती सोबत वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी या व्यापक उद्देशाने प्रथमत:च वाचनवेडा पुरस्कार हा आयोजित करण्यात आला होता. चोपडा सायकलिस्ट संस्थेचे अनेक उपक्रम सुरू आहेत त्यातला हा उपक्रम वाचनवेडा सायकलिस्ट पुरस्कार होय. वाचन स्पर्धेत सुमारे 40 हून अधिक वाचन प्रेमी यांनी राज्यभरातून भाग घेतला. त्यात पुस्तक वाचन,पुस्तक परिचय, गुगल मीटिंग, बॉण्डिंग विथ बुक्स, साहित्यावरच्या प्रश्न मालिका आणि चर्चासत्रे असे भरगच्च कार्यक्रम झाले. दरम्यान, परीक्षक समितीच्या अंतिम निर्णयानुसार प्राध्यापक राजेंद्र खैरनार हे पुरस्कार विजेते ठरले.
सदर पुरस्कार कै. सी. एम. पाटील (माजी मुख्याध्यापक चहार्डी हायस्कूल तालुका चोपडा) यांच्या स्मरणार्थ जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे उपाध्यक्ष रुपेश महाजन यांच्या सौजन्याने प्रदान करण्यात येतो. चिंचला आश्रम शाळेत(जि. नाशिक) येथे चोपडा सायकलिस्ट ग्रुपचे संकल्पनाकार प्रशांत गुरव(वडती), डी एस पाटील व एस पी धनगर यांच्या शुभहस्ते प्राध्यापक खैरनार व त्यांच्या पत्नी सौ. सोनाली खैरनार या दांपत्याचा गौरव करण्यात आला.
सदर पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, मानपत्र, एक मौलिक ग्रंथ व एक हजार रुपयांचा धनादेश असे आहे. विशेष म्हणजे पुरस्काराबद्दल प्राप्त झालेली एक हजार रुपयाची रक्कम प्राध्यापक खैरनार यांनी पुन्हा त्यात एक हजार रुपये ऍड करून त्यांच्या वाचनालयाला ग्रंथालयाला पुस्तकांसाठी भेट म्हणून देऊ केले आहेत.
चोपडा सायकलिस्ट ग्रुपची एक अनोखी विषयी बाब म्हणजे हा पुरस्कार ते प्राप्त सन्मानर्थीचा गौरव करण्यासाठी खास स्वतः त्यांच्या घरी अर्थात कर्मभूमी असलेल्या कार्यक्षेत्री जाऊन करतात. चिंचला (तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक) येथील या आश्रम शाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा एस पी राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक के. एम. महाले, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.गोविंद पाटील तर आभार दीपक कुंभार यांनी मानले. कार्यक्रम अतिशय आनंदी उत्साही वातावरणात संपन्न झाला.