चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 10 जून : नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा काल मोठ्या दिमाखात शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला. दरम्यान, आज संध्याकाळी केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून रक्षा खडसेंना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे.
रक्षा खडसेंना मिळाली मोठी जबाबदारी –
एनडीए सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांच्या खातेवाटपात रक्षा खडसे यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवी दिल्लीत काल पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. दरम्यान, सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री असा प्रवास रक्षा खडसे यांचा राहिलाय.
महाराष्ट्रातून महायुतीतील एकमेव महिला खासदार –
सलग दोन वेळा रावेरच्या खासदार राहिलेल्या रक्षा खडसे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीतील एकमेव महिला खासदार असल्याने त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. यानंतर रक्षा खडसे यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीची सुरूवात –
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून रक्षा खडसे यांना राजकीय पार्श्वभूमी लाभल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात सरपंच पदापासून सुरू झाली. तसेच त्यांचा राजकारणातला आलेख हा नेहमीच चढत्या क्रमाने राहिला असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी सरपंच, जिल्हा परिषद सदस्या, खासदार अशा पदावर काम केले आहे. दरम्यान, आता त्यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
हेही वाचा : नरेंद्र मोदींनी स्विकारला पंतप्रधान पदाचा पदभार, पहिलीच सही शेतकऱ्यांसाठी, घेतला ‘हा’ मोठा निर्णय?