जळगाव, 22 जानेवारी : राज्यात महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर पदाविषयी सर्वीकडे उत्सुकता असताना मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. महापौर पदांची आरक्षण सोडत आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात काढण्यात आली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली आहे.
जळगाव महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित –
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षणाचे वाटप घोषित केले आहे. यानुसार, जळगाव महानगर पालिकेत महापौर पद ओबीसी महिला उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिला असे करण्यात आल्यानंतर आता कोणाची महापौर पदी वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
जळगावात महायुतीला ऐतिहासिक यश –
जळगाव महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत जळगाव महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला. यामध्ये जळगावमध्ये 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 जागेवर विजय झाला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. यासोबतच, एका अपक्ष उमेदवाराने देखील विजय मिळवलाय.
राज्यातील 29 महापालिकांचं महापौर पदाचं आरक्षण खालीलप्रमाणे –
- छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
- नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)
- वसई- विरार: सर्वसाधारण
- कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
- कोल्हापूर: ओबीसी
- नागपूर: सर्वसाधारण (महिला)
- बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
- सोलापूर: सर्वसाधारण
- अमरावती: सर्वसाधारण
- अकोला: ओबीसी (महिला)
- नाशिक: सर्वसाधारण (महिला)
- पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
- पुणे: सर्वसाधारण (महिला)
- उल्हासनगर: ओबीसी
- ठाणे: अनुसूचित जाती
- चंद्रपूर: ओबीसी (महिला)
- परभणी: सर्वसाधारण (महिला ) (आक्षेप)
- लातूर: अनुसूचित जाती (महिला )
- भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण (महिला)
- मालेगाव: सर्वसाधारण (महिला)
- पनवेल: ओबीसी
- मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)
- नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)
- सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
- जळगाव: ओबीसी (महिला)
- अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
- धुळे: सर्वसाधारण (महिला)
- जालना: अनसूचित जाती (महिला)
- इचलकरंजी: ओबीसी






