जळगाव, 23 जानेवारी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि. 22) जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात एरंडोल तालुक्यातील गालापूर, पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे तसेच जामनेर तालुक्यातील गारखेडा या गावांमध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या डिजिटलायझेशन उपक्रमांचे तसेच जलतारा शोष खड्डे आणि अन्य लोकोपयोगी विकासकामांचे उद्घाटन सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनाल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील तिन्ही गावांमध्ये सोनाली कुलकर्णी यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांचा उत्साह व सहभाग पाहून त्या भावूक झाल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
घोडागाडीतून मिरवणूक
एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे सोनाली कुलकर्णी यांची घोडागाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने रेडियम खेळ सादर करत त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील तसेच स्थानिक अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
विकासकामे पाहून भारावल्या सोनाली –
जिल्ह्यातील तिन्ही ग्रामपंचायतींना दिलेल्या भेटीदरम्यान तेथील विकासकामे आणि ग्रामपंचायतींची प्रगतीशील वाटचाल पाहून सोनाली कुलकर्णी भारावून गेल्या. ग्रामपंचायतींच्या कार्यपद्धतीचे त्यांनी विशेष कौतुक करत ग्रामस्थांचे आभार मानले.






