चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुक्ताईनगर, 4 मे : रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या सभेचे काल मुक्ताईनगरात आयोजन करण्यात आले. दरम्यान, या सभेत पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार भाषण केले. भाषणा दरम्यान त्यांनी भावूक होत शरद पवार गटात राहण्यासंदर्भातील भूमिका स्पष्ठ केली.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे? –
रोहिणी खडसे जाहीरसभेत बोलताना म्हणाल्या की, एकनाथ खडसे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. आणि या भेटीत शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, मला तुमच्या पक्षात थांबायचे आहे. कारण मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते. कारण मला ह्या पक्षातील आपले नेतृत्व आवडते. आपल्या नेतृत्वात आमच्या वाईट काळात जी आम्हाला साथ दिली. मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि म्हणून मला या पक्षात थांबायचे आहे, असे रोहिणी खडसे यांनी स्पष्ठ केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काम निष्ठेने करणार –
कन्या सुप्रिया सुळे यांना ज्याप्रमाणे सांभाळतात त्याप्रमाणे मला सांभाळावे, अशी विनंती मी त्यांना केली होती, असेही रोहिणी खडसे यांनी सांगितले. पक्षातील नेत्यांनी मला एकटे पडू दिले नाही. यावेळी पक्षातील नेत्यांनी जो विश्वास दाखवला त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काम निष्ठेने करणार असून भविष्यात देखील या पक्षात काम करत राहील. तसेच तुमच्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नसल्याचे रोहिणी खडसे यांनी पक्षातील नेत्यांना जाहीरसभेत आश्वस्त केले.
मुक्ताईनगरातून अधिक लीड मिळवून देणार –
रोहिणी खडसे श्रीराम पाटील यांना निवडून आणण्याबाबत म्हणाल्या की, आमच्या प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल ज्यावेळी लागेल, त्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे मुक्ताईनगरातून मिळवून देऊ आणि श्रीराम पाटील यांना निवडून आणू. तसेच जर मताधिक्य कमी झाले तर यासाठी मी सर्वस्वी जबाबदार राहील आणि जर लीड जास्त मिळाली तर यासाठी येथील जनता जबाबदार राहील, असेही खडसे म्हणाल्या.
यांची होती उपस्थिती –
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा माजी अध्यक्ष अरूण भाई गुजराथी, रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतिष अण्णा पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, आमदार शिरीष दादा चौधरी, आमदार राजेश एकडे, उमेदवार श्रीराम दादा पाटील, जिल्हा निरीक्षक प्रसेन्नजित पाटील, संतोषभाऊ रायपुरे, माजी आमदार अरुण दादा पाटील, संतोषभाऊ चौधरी, वंदना ताई चौधरी, विनोद भाऊ तराळ, डॉ जगदीश दादा पाटील, ईश्वर भाऊ रहाणे, सोपान पाटील, एजाज भाई मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उ बा ठा) संयुक्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : “….अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते,” देवेंद्र फडणवीसांबाबत भाजप नेते विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?