मुंबई, 1 ऑक्टोबर : लोकसभा निवडणुकीत 48 मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघात व्होट जिहाद झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातील कणेरी मठ या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात फडणवीसांनी हा दावा केला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया आल्या असून खासदार संजय राऊत यांनी देखील या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा –
कणेरी मठ याठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपण पाहिले कशाप्रकारे व्होट जिहाद पाहण्यास मिळाला. काय अर्थ आहे व्होट जिहादचा? धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर पाच विधानसभेत 1 लाख 90 हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार हा मालेगाव मध्य या एका विधानसभेत 1 लाख 94 हजार मतांनी मागे जातो आणि 4 हजार मतांनी निवडणूक हरतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, निवडणुकीतली हार-जीत महत्त्वाची नाही. कधी हा पक्ष तर कधी तो पक्ष जिंकेल पण काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे की, आमची संख्या कमी असली तरीही आम्ही संघटित मतदान करुन हिंदुत्ववाद्यांना पराभूत करु शकतो. आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो आहे. तशा प्रकारे काळ सोकावतो असून या निवडणुकीतला व्होट जिहाद आहे. त्यात 48 पैकी 14 मतदारसंघांमध्ये अशा जिहादी पद्धतीने आपल्याला मतदान होताना दिसले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल –
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, व्होट जिहाद काय असतो ते त्यांना एकदा विचारा. सध्या त्यांच्या तोंडात जिहाद खूप येत आहे. ते दुसरीकडे कुठे तलाक देत आहेत का? की कोणाशी निकाह करत आहेत?, मतांसाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी ते निकाह करत आहेत का? हे काय सारखे जिहाद-जिहाद करत आहेत. दरम्यान, आधी जिहादचा अर्थ समजून घ्या अन् मग बोला, असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय.
तुम्हाला भ्रष्ट लोकांची मत चालतात. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांशी निकाह लावला असे बोलू का? 70 हजार कोटींचे घोटाळे, एकनाथ शिंदे यांचे घोटाळे, चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतले. मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावला असे सांगू का?, असा टोला देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
हेही वाचा : पारोळ्यात तलाठ्याने मागितली लाच अन् अन् एसीबीने पकडले रंगेहाथ, नेमकं काय प्रकरण?