मुंबई, 30 नोव्हेंबर : ज्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते त्यावेळीही भारतीय जनता पक्षाचे 100 हून अधिक आमदार होते. 100 हून अधिक आमदार असलेल्या भाजपने फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिले, असे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले. खरंतर, एकनाथ शिंदे यांनी त्याचवेळी त्यांच्याकडे गृहमंत्रीपद मागायला हवे होते, मुख्यमंत्री किंवा मंत्रीपदाबाबतचा निर्णय असेल तो महायुतीचा प्रश्न आहे. पण भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या स्वभाव धर्माला वागला. असेही राऊत यावेळी म्हणाले. आज सकाळी माध्यमांसोबत ते बोलत होते.
‘ते’ कोणाताही मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत –
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी गेले आहेत. एकनाथ शिंदे हे ज्यावेळी आपल्या गावी जातात तेव्हा ते एखादा मोठा निर्णय घेतात, असे संजय शिरसाट म्हणाले. ईडी-सीबीआयचे भय ज्यांना आहे ते कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत, असा टोला यावर बोलताना राऊत यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे हे मनाने खचले आहेत. त्यांचे मानसिक-शारिरीक स्वास्थ्य बिघडलेले आहे. त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही, याला जबाबदार कोण? असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.
View this post on Instagram
न्यायालयाकडून कुठलीही अपेक्षा नाही –
संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलीही अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. मग सर्वोच्च न्यायालय कशाकरिता स्थापन केलेले आहे. ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाते आणि ती याचिका न्यायालय दोन मिनिटात फेटाळते. जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाहीत आणि ज्यावेळी तुमचा पराभव होतो तेव्हा तुम्ही ईव्हीएमची तक्रार घेऊन येतात, असे सर्वोच्च न्यायालय यावेळी म्हणते. मात्र, निकाल हा सकारत्मक असो किंवा नकारात्मक आम्ही सातत्याने मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत.
दरम्यान, मोदी आणि शहा यांना जर जिंकून येण्याची खात्री असेल तर त्यांनी मतपत्रकिवेर जिंकून यावे. मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी ते का घाबरत आहेत. जगामध्ये कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. यामुळे भारतातच ईव्हीएमचा अट्टहास कशाला, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “….ईव्हीएमसाठी एवढा अट्टहास का?”, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत रोहिणी खडसे काय म्हणाल्या?