चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 20 सप्टेंबर : रावेर तालुक्यातील निंबोरा बुद्रूक येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अपात्र केल्याची कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अजून एका ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अपात्र केल्याची माहिती समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रूक येथील महिला सरपंच यांनी मासिक व ग्रामसभा न घेतल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे. कौसरबी हिलाल पटेल असे त्या महिला सरपंचाचे नाव आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रुक गावातील ग्रामपंचायतीवर सन 2021 मध्ये महिला सरपंच म्हणून कौसरबी हिलाल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार सरपंच पदावर असताना मासिक सभा व ग्रामसभा घेण्याचे अनिवार्य नियम ठरलेले आहेत. असे असताना कौसरबी पटेल यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतमध्ये मासिक व ग्रामसभा न घेतल्याची तक्रार उपसरपंच शकील वेडू पटेल आणि तायेर अब्दुल पटेल यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीचे आदेश अहवाल सादर करण्याचे सांगितले. या अहवालात कौसरबी हिलाल पटेल दोषी आढळल्याने त्यांना अपात्र करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते चौकशीचे आदेश –
तक्रारदार यांच्यातर्फे जेष्ठ वकील अॅड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. दरम्यान, अॅड. विश्वासराव भोसले यांनी याबाबत सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना सांगितले की, सदर प्रकरणातील सरपंच यांनी मासिक सभा व ग्रामसभा घेतली नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम सात व 36 च्या तरतुदीचा त्यांनी भंग केला. मासिक सभा तसेच ग्रामसभा नियमित घेणे हे सरपंच यांचे कर्तव्य असते. असे असताना त्यांनी मासिक सभा तसेच ग्रामसभा न घेतल्याने कर्तव्यात कसूर ठेवला. याप्रकरणाची तक्रार उपसरपंच शकील वेडू पटेल आणि तायेर अब्दुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. दरम्यान, धरणगाव आणि पारोळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना सखोल चौकशी करत त्यांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
मासिक व ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र –
त्यानुसार, गटविकास अधिकारी यांनी कंडारी बुद्रुक ग्रामपंचातय येथे जावून याची सखोल चौकशी करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. दरम्यान, सरपंच म्हणून पदावर काम करत असलेल्या कौसरबी हिलाल पटेल यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम सात व 36 नुसार ग्रामपंचायतीमध्ये मासिक व ग्रामसभा न घेतल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत