सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 3 ऑगस्ट : पारोळा तालुक्यातील मौजे सर्वे बु. म्हसवे येथे प्रांताधिकारी मनीष गायकवाड व तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी शेतकऱ्यांच्या यांचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन ई-पीक पाहणी केली.
प्रांताधिकाऱ्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी –
सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई- पीक पाहणी बंधनकारक केली आहे. तसेच शेतकरी वर्गाने विविध योजना लागू होण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे असते. 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रांताधिकारी यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जात जनजागृती केली. दरम्यान, पीक पाहणीचे महत्त्व पटवून देत येत्या 8 दिवसात सर्वांनी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यांची होती उपस्थिती –
प्रांताधिकाऱ्यांनी यांनी मौजे सर्वे बु. म्हसवे येथे दिलेल्या भेटप्रसंगी सरपंच, उपसरपंच, तलाठी शिवाजी पारधी, निशिकांत माने (पाटील) प्रशांत निकम, ज्ञानेश्वर पन्हाळकर, कोतवाल गोपाल माळी, कैलास माळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ई-पीक पाहणीचे महत्व –
सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येते. परंतु, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केली आहे, अशाच शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. तसेच विमा कंपन्यांकडून देखील ई- पीक पाहणीचा अहवालाद्वारे शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येत असते. यामुळे शेतकरी पीक विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई-पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरवण्यात येत असते.
ई- पीक पाहणी बंधनकारक –
आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या वर्षी ई-पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. कारण, सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई- पीक पाहणी बंधनकारक केली आहे. 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट, काय नेमका अंदाज?