चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 30 डिसेंबर : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून आज सोमवार 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस शिल्लक आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना देखील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा कायम आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तासांपुर्वी नेमकी काय घोषणा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
महानगरपालिका निवडणुकीत इच्छुकांना आज दुपारी 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत आपला उमदेवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून एबी फॉर्म मिळावा यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप होण्यासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील स्थानिक नेत्यांच्या बैठका पार पडत आहेत. दरम्यान, हे तिनही पक्ष महायुती म्हणून लढण्यास तयार असले तरी जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये.
आजचा दिवस महत्वाचा –
महानगरपालिका निवडणुकीत उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. जागावाटपाबाबत आज पक्षातील नेत्यांकडून नेमकी कोणती घोषणा केली जाते याकडे देखील इच्छुकांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, आजच्या आज दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.
आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया –
चाळीसगावचे आमदार तथा भाजपचे निवडणूक प्रभारी मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिकेतील जागावाटपासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेतली. जळगावात महानगरपालिकेत युतीत लढण्यापेक्षा महायुतीत लढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यासाठी बैठक पार पडत आहेत. काही जागांचा तिढा बाकी आहे. जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर त्याबाबतची अधिकृत घोषणा आज सोमवार 30 डिसेंबर रोजी करण्यात येईल. मात्र, एखाद्या गोष्टीसाठी अडून राहण्याची भूमिका असेल तर सोबत आणि शिवाय लढणे असे पर्याय सर्वांसाठी राहणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ठ केले.






