शहादा (नंदुरबार), 11 फेब्रुवारी : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना काल 10 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ ते 10 वाजेच्या दरम्यान घडली. यामध्ये 8 ते 9 दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीमुळे दुकानांमधील चारचाकी वाहनांचे स्पेअरपार्ट, मंडप साहित्य, इलेक्ट्रिक दुकानातील साहित्य, साऊंड सिस्टम यांचे नुकसान झाले. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील व्यापारी संकुलातील सकाळच्या सुमारास सर्व दुकाने उघडल्यानंतर त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक आग लागली. परिणामी ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने जवळपास 8 ते 9 दुकाने जळून खाक झाली. यावेळी आगीमुळे रस्त्यावर दुरूस्तीसाठी उभा असलेला डंपरचा एक भाग देखील जळून खाक झाला. यासोबतच गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी लागलेली चार दुचाकी आणि दोन चार चाकी वाहने जळून खाक झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, अचानक लागलेल्या आगीमुळे अनेकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दुकानांना भीषण आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशामन दल दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 तास अथक प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आली. मात्र, आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने या भीषण आगीत जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यानंतर प्रशासनाच्यावतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
‘…तर नुकसान टाळता आले असते!’-
भीषण आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्थानिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. यासोबतच नगरपालिकेचे अग्निशमन बंब वेळेत हजर न झाल्याने मोठे नुकसान झाल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केला. वेळीच नगरपालिकेने दखल घेतली असती आणि आग विझविण्याचा प्रयत्न झाला असता तर मोठे नुकसान टाळता आले असते, असेही स्थानिक नागरिकांनी म्हटलंय. दरम्यान, आगीच्या घटनेत दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यावेळी दुकान मालकांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत