चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर – तरुणांवर बेरोजगारीचं संकंट कोसळू नये यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरातील तरुणांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे.
नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी औचित्याच्या मुद्द्यावरुन बोलताना आमदार राजेश पाडवी यांनी बेरोजगार तरुणांसदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडला.
काय म्हणाले आमदार राजेश पाडवी –
शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यावेळी विधानसभेत म्हणाले की, मागील सरकारमधील अनेक यशस्वी योजनांपैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार आणि नवतरुणांना आत्मनिर्भर व सक्षम बनवण्यासाठी मोलाची ठरली.
आज केवळ माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजनेच्या अंतर्गत 3 हजार 510 प्रशिक्षणार्थी मागील 5 महिन्यांपासून कार्य करत आहेत. येत्या 1 ते दीड महिन्यात त्यांचा प्रशिक्षण कालावधी देखील समाप्त होणार आहे.
सहाय्यक प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पुढे काय?, पुन्हा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील यासाठी अशा प्रशिक्षणार्थी सहाय्यकांना सरकारच्या वतीने पुढील शासनाच्या ठोस निर्णय येईपर्यंत 6 महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी तत्त्वावर पुढील आदेश देण्यात यावेत.
यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बेरोजगार सहायकांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मुख्यमंत्री युवा कार्य कुशल योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार स्वयंसेवकांना योग्य तो न्याय मिळेल. यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी केली आहे.