शिरपूर (धुळे), 28 जानेवारी : धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी एटीएम कार्ड बदलून पैसे चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चोरट्यांकडून 94 एटीएम कार्डसह साडेचार लाख रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. एकूण चार चोरट्यांना पोलिसानी अटक केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
धुळे येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात काही तरूण मुंबई पासिंगच्या वाहनाने संशयितरित्या फिरत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद येथे जाऊन संशयितांचा आणि वाहनाचा शोध घेतला. यावेळी साखर कारखान्याजवळ एमएच 02 बीझेड 3439 हा नंबर असलेल्या गाडीमध्ये चार जण मिळून आले.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, यानंतर पोलिसांनी त्यांना हिसका दाखवताच त्यांनी त्यांची नावे सांगितली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील आहे. यावली त्यांची आणि त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात तब्बल 94 एटीएम कार्ड मिळून आले. या एटीएम कार्डसह पोलिसांनी साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चारही जणांवर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांच्या तपास टोळीतील एका आरोपीने ते लोकांना कशाप्रकारे गंडा घालायचे, याबाबत कबुली दिली.
हेही वाचा – 74 वा प्रजासत्ताक दिवस, धुळ्यातील नगाव येथे उत्साहात साजरा; पाहा VIDEO
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी अन्साराम आगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, भिकाजी पाटील, संदीप पाटील, संतोष पाटील, जयेश मोरे, इसरार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील प्रशांत देशमुख आणि देवेंद्र वेधे यांनी केली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन –
या चोरट्यांसोबत आणखी कुणी सहभागी आहे का, याचा तपासही पोलीस करत आहेत. तर नागरिकांनी एटीएम कार्डचा वापर काळजीपूर्वक करावा. एटीएम कार्डसह त्याचा पिन नंबर कोणालाही कळू देऊ नये, असे आवाहन धुळे पोलिसांनी केले आहे.