मुंबई, 19 फेब्रुवारी : केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय झाला. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. इतकेच नव्हे तर धनुष्यबाणासह शिवसेना हे नावही एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. 17 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि ही माहिती 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, असे म्हणत देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
माझी खात्रीची माहिती आहे….
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत…
हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b— Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023
उद्धव ठाकरें सुप्रीम कोर्टात जाणार –
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे राहणार असल्याचा निर्णय दिली. यानतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपसह विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत थेट आव्हानही दिले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी की, 75 वर्षांचं स्वातंत्र्य संपले आहे आणि देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
शरद पवारांनी काय सल्ला दिला –
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निकालावर त्यांचे मत व्यक्त केले. ‘हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचे. त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला. काँग्रेसचे गाय-वासरू चिन्ह होते. पण त्यांनी पंजा घेतला. पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही. काही दिवस चर्चा होत राहील. नंतर लोक विसरून जातील,’ त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.