जळगाव, 29 डिसेंबर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या 30 डिसेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. दरम्यान, जळगावात भाजप, शिंदेंची शिवसेना तसेच अजित दादांची राष्ट्रवादी यांच्यात युतीचा पेच कायम असताना जळगावात ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची आघाडी झाल्याची माहिती समोर आली आहे.
संतोष चौधरी यांची माहिती –
महानगरपालिका निवडणुकीतील आघाडीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची काल 28 डिसेंबर रोजी जळगावात बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार संतोष चौधरी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, जळगाव शहराच्या विकासासाठी करण्यात आलेल्या आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) म्हणून लढणार आहोत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 38 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 37 जागांचे वाटप करण्यात आलेले आहे.
View this post on Instagram
मनसेबाबतच्या जागावाटपाचा निर्णय ठाकरे गटाच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घेण्यात येईल. यासोबतच इतर पक्ष जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून आमच्या वाटेला आलेल्या जागांमधून आम्ही त्यांना त्या जागा देणार आहोत. दरम्यान, आम्ही वंचित, काँग्रेस तसेच भाजपविरोधी समविचारी पक्ष यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही संतोष चौधरी म्हणाले.
जळगाव शहराच्या विकासासाठी आघाडी – संजय सावंत
शिवेसना ठाकरे गटाचे संजय सावंत म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांची आम्ही आघाडी जाहीर करत आहोत. येत्या 29 आणि 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा कार्यक्रम आम्ही निश्चित केलेला आहे. जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही ही आघाडी केली असून भाजपविरोधी समविचारी पक्ष यांच्याशी देखील चर्चा सुरू असून ते देखील आमच्या बरोबर येणार असल्याचे सावंत म्हणाले. काँग्रेससोबत चर्चा सुरू असून आमच्यात तडजोड करून जागावाटप करत आम्ही जळगाव महानगरपालिकेची निवडणूक 75 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ठ केले.






