मुंबई, 18 जून : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीला चार ते पाच महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालीय. या पार्श्वभूमीवर मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जे गद्दार आहेत आणि पक्ष चोर आहेत त्यांना आम्ही पुन्हा घेणार नाही. भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष असल्याची टीका देखील त्यांनी केलीय.
नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचंय –
महायुतीचे सरकार फक्त सहा महिने असून नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचे आहे. आपण कुठून सुरू केले आणि भाजपने कुठून केले. ते एवढे असून नऊवर आहेत. आपले इतके पळून गेले तरी आपण नऊ आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, उत्तर पश्चिमची जागा आपण जिंकणार आणि दहा जागा होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच लोकसभेत आपण पाहिले की मतदारांनी कौल दाखवला असून मला एकटा पुढे जायचे नाहीय, मला सर्व तरुणांना सोबत घेऊन जायचे आहे. महाराष्ट्राने दाखवले की देशात मस्ती, हुकूमशाही चालणार नाही. भाजपवाले छाती फुलवतात, ती टाचणीने फोडता येते, अशी खोचक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली.
इथे लोकशाही चालते –
अमोल कीर्तीकर यांचे निवडणूक बघतली असता यामध्ये यंत्रणेचा गैरवापर केला गेला. भाजपच्या माजी मंत्रीने सांगितले, जे भाजपच्या मनात आहे, सिंगल पार्टी रूल आणायचे, संविधान भाजप बदलायचे आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, 400 पार आम्हाला हवे आहे, कारण 400 पार झाले तर आम्हाला संविधान बदलायचे आहे. पण याचं संविधानाने इथे प्रत्येकाला आवाज दिलेला आहे असून आपण केंद्र सरकारला दाखवलंय, या देशात कुणाची मस्ती चालत नाही. हुकूमशाही चालत नाही, इथे लोकशाही चालते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.