चाळीसगाव (प्रतिनिधी) 10 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात तीन दिवसांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. यानंतर त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीनं नाशिकच्या अशोका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी झाला होता गोळीबार –
भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे हे बुधवारी 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयात शिरून काही कळण्याच्या आतच मोरे यांच्यावर गोळीबार केला आणि गोळीबारानंतर कारमधून घटनास्थळावरून अज्ञात आरोपी फरार झाले. दरम्यान, यानंतर आज पहाटे उपचारादरम्यान, महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्यात सलग गोळीबाराच्या घटना –
दरम्यान, मागच्या अगदी काही दिवसात राज्यात गोळीबाराच्या सलग तीन घटना समोर आल्या आहेत. उल्हासनगर येथे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर बुधवारी चाळीसगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच परवा गुरुवारी दहीसर येथे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या करण्यात आली.