चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 16 मार्च : कठोर मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाथरी येथील (सध्या रावेर येथे स्थायिक) तरूणीने तीन वर्षात कठोर मेहनत करून एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेत (एमईएस – MES) पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.
एमपीएससीद्वारे 2022 साली घेण्यात आलेल्या एमईएस परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये श्रृतीने अनुसूचित जाती (SC) या प्रवर्गातून महिला गटात राज्यात पहिली येण्याचा मान मिळवला असून लवकरच ती राज्याच्या जलसंपदा विभागात सहायक अभियंता या वर्ग-2 च्या पदावर रूजू होणार आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
श्रृती नेटके ही मुळची जळगाव जिल्ह्यातील पाथरी गावाची रहिवाशी असून सध्या ती वडिलांच्या नोकरीनिमित्त रावेर येथे राहते. श्रृतीचे वडील रसळपुर येथे महावितरणमध्ये ऑपरेटर असून आई आश्रमशाळेत शिक्षिका आहे. तिचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे रावेर येथे झाले. दरम्यान, नाशिक येथील के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च येथे तिने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले आहे.
इंजिनिअरींग सुरू असतानाच MES ची केली तयारी –
श्रृतीने नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून एमईएससाठी तयारी सुरू केली आणि इंजिनिअरिंग पुर्ण झाल्यानंतर एक वर्ष सेल्फ स्टडी केला. दरम्यान, इंजिनिअरिंग सुरू असताना कॉलेजनंतरच्या मिळालेल्या वेळात अभ्यास केला. इंजिनिअरिंगनंतर सेल्फ स्टडी करत असताना श्रृतीचे सकाळी आठ वाजेपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत, असे दिवसभर अभ्यासाचे नियोजन असायचे. दरम्यान, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवत उंच भरारी घेत तिने एमईएसमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.
एमईएस ही परिक्षा नेमकी काय? –
महाराष्ट्र अभियांत्रिका सेवा (एमईएस) ही एमपीएससीद्वारे वर्ग-दोन पदासाठी घेतली जाणारी परिक्षा आहे. यासाठी पुर्व परिक्षा, मुख्य परिक्षा आणि मुलाखत अशी तीन टप्पे आहेत. एमईएसची पुर्व परिक्षा ही 200 मार्क, मुख्य परिक्षा 400 मार्क तर मुलाखत 50 मार्कची असते. यानंतर सार्वजनिक बांधकाम तसेच जलसंपदा विभागात अभियंता म्हणून रूजू होता येते. दरम्यान, श्रृतीने पुर्व परिक्षेत 100 पेक्षा अधिक गुण मिळवत मुख्य परिक्षेत 258 गुण तर मुलाखतीत 26 गुण मिळवत तिने हे यश संपादन केले.
पहिली आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती? –
श्रृती राज्यात पहिली आल्यानंतर तिने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह‘सोबत संवाद साधला. ती म्हणाली की, मी पहिली येणार, अशी अपेक्षा केली नव्हती. मात्र, यासाठी मेहनत केली होती. यामुळे पहिली आल्याने खुप आनंद झाला. स्पर्धात्मक परिक्षांसाठी भावनिक साथ फार महत्वाची असते. यामुळे मला मिळालेल्या यशात माझ्या आई-वडिलांनी मोठ्या प्रमाणात भावनिक साथ दिली असल्याची तिने सांगितले.
स्पर्धा परिक्षेसाठी खूप लांबची प्रक्रिया पार पडत असते. यामुळे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. नवीन काही गोष्टी करण्यापेक्षा एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव केला पाहिजे. तसेच यामध्ये सातत्य हेच महत्वाचे असल्याचेही तिने सांगितले.
हेही वाचा : Special Story : 2 वर्षांची मेहनत अन् नंदुरबारची श्रद्धा आली देशात पहिली