मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 25 एप्रिल : गेल्या काही दिवसापासून संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात जैन धर्मियांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जैन साधूंकडून पैशाची मागणी करत मारहाण केली. तसेच विलेपार्ले येथे अतिक्रमणच्या नावाने जैन मंदिराची तोडफोड करण्यात आली, साधुसंत रस्त्यावर विहार करत असताना जाणीवपूर्वक कट मारून अपघात घडवून आणण्यात येत आहे. यासोबतच पहलगाम काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.
अशा सर्व घटनेने संपूर्ण जैन समाज व हिंदू समाज दुखावला गेला असून शासनातर्फे दोषींवर कडक शासन करण्यासाठी व सदरील सर्व घटनांच्या निषेध व्यक्त करण्यासाठी चोपडा तालुका सकल जैन समाजातर्फे निषेध मूक मोर्चा काढण्यात आला.
चोपड्यातील रथ गल्ली, जैन मंदिरपासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. शांततेत मार्गक्रमण करत शनी मंदिर चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे समारोप करण्यात आला.
समारोप वेळी दीपक राखेच्या यांनी सर्व घटनेच्या उल्लेख करत व मोर्चाचे महत्त्व विशद करत सूत्रसंचालन केले. दिलीप नेवे यांनी इतर अनेक घटनांच्या उल्लेख करत निषेध व्यक्त केला. प्रा. शांतीलाल बोथरा यांनी नायब तहसीलदार योगेश पाटिल यांना निवेदन देत दोषींवर कडक कारवाई करण्यात यावे, अशी मागणी केली.
निवेदनावर राजेंद्र जैन, रमेश जैन, संजय श्रावगी, आदेश बरडीया सुनील जैन, डॉ. निर्मल जैन भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, विभागीय उपाध्यक्ष लतिश जैन यांच्या सह्या होत्या. त्यासोबतच समाजातील सर्व सदस्यांचे सह्यांचे निवेदनही सोबत देण्यात आले. मोर्चा यशस्वीतेसाठी जैन नवयुवक मंडळ बहु मंडळ भारतीय जैन संघटनाच्या सदस्यांनी परिश्रम केले.