अमळनेर, 3 ऑगस्ट : सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात फक्त सुशिक्षित, हुशार आणि बुद्धिमान लोकं सहभागी होतात, या विचाराला खान्देशातील एका शेतकऱ्याने छेद दिला आहे. खान्देशचे सुपूत्र आणि जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले अहिराणी कवी हे शरद धनगर हे सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात आज दिसणार आहेत. त्यांच्या या सहभागाबाबत“सुवर्ण खान्देश लाईव्ह”च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
काय म्हणाले शरद धनगर –
शेती, माती, कविता आणि गझल जगत असलेले अहिराणी कवी शरद धनगर यांनी “सुवर्ण खान्देश लाईव्ह”सोबत आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून मी हा कार्यक्रम पाहत होतो. पण आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ असं कधी वाटलं नव्हतं. यावर्षी विविध टप्पे पार करत मी या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. हा प्रवास फार सुखद स्वप्नातही विचार केला नसेल, असा आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
शरद धनगर हे जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण डीएड पर्यंत झाले असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. नोकरी न मिळाल्याने ते शेती व्यवसायाकडे वळले. याचदरम्यान, कविता, गझलची आवड असल्याने ते स्वत:ही उत्तम अशा कविता महाराष्ट्राच्या विविध कार्यक्रमात, संमेलनात सादर करतात.
आज आणि उद्या दिसणार सोनी मराठीवर –
शरद धनगर हे सोनी मराठीवरील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) दोन दिवस सहभागी झालेले दिसणार आहेत. रात्री 9 वाजता हा एपिसोड सोनी मराठी या चॅनेलवर टेलिकास्ट होईल.
जिंकलेल्या पैशातून काय करणार –
शेतकरी, कवी शरद धनगर हे कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पैसे जिंकतील, या पैशाची काही रक्कम अनाथाश्रम, काही रक्कम ही त्यांच्या आगामी काळातील पुस्तक प्रकाशनासाठी तर काही रक्कम मी त्यांच्या शेतीत सिंचनाचं साधन नसल्याने ते त्यासाठी वापरणार आहेत. रासायनिक शेतीमुळे आरोग्यासोबतच जमिनीचेही नुकसान होत आहे. त्यामुळे मला जैविक शेतीचा प्रयोग करायचा आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शेतकऱ्याला कमी लेखू नका, तो सुद्धा एक सोनी मराठीवरील कोण होईल करोडपती सारख्या चांगल्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतो, चांगली रक्कम जिंकू शकतो, ज्ञान ही कुणाची मक्तेदारी नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी“सुवर्ण खान्देश लाईव्ह”सोबत बोलताना दिली.