प्रकट भए गुरु तेग बहादुर, सकल सृष्टि पर ढापी चादर (ज्यांना सामान्यत ‘हिंदकी चादर’ संबोधले जाते)
श्री गुरु तेग बहादूर साहिब हे शीख धर्माचे नववे गुरु होते आणि त्यांना त्यांच्या महान बलिदानामुळे ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाते. नोव्हेंबर २०२५ मध्ये, त्यांच्या अतुलनीय हौतात्म्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हा विशेष लेख प्रकाशित करत आहोत.
श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचा जन्म एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे सहावे शीख गुरु, गुरु हरगोविंद साहिब आणि माता नानकी यांच्या घरी झाला. लहानपणी त्यांचे नाव त्याग मल होते. त्यांचे लग्न वयाच्या ११ व्या वर्षी बीबी गुजरी यांच्याशी झाले. वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रे आणि युद्धकला देखील शिकली. युद्धात दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना तेग बहादूर (तलवारीचा धनी) हे नाव मिळाले.
गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे केवळ शीख धर्मासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या इतिहासातील एक सर्वोच्च आदर्श आहे. गुरु तेग बहादूर यांचे जीवन त्याग, साहस, नैतिकता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणाचे एक ज्वलंत उदाहरण असून त्यांचे जीवन सत्य, अहिंसा आणि मानवतेसाठी प्रेरणादायी आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबांनी शांतता, त्याग, सहिष्णुता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूल्यांवर जोर दिला. आनंदपूर साहिब या पवित्र स्थळाची त्यांनी स्थापना केली, जे आजही शीख धर्माचे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे.
१४ व्या वर्षी मुघल सैन्याविरुद्ध करतारपूरच्या लढाईत गुरु तेग बहादुर यांनी उल्लेखनीय युद्ध पराक्रम दाखविला. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी स्वत:ला तेगचे मालक म्हणून स्थापित केले होते. म्हणूनच तेगबहादूरजींना ११ ऑगस्ट १६६४ रोजी गुरता गद्दीवर नववे गुरु म्हणून विराजमान करण्यात आले.
औरंगजेबाने सर्व सामान्य लोकांना धर्म बदल करा असा आदेश जारी करुन तलवारीच्या धाकावर लोकांचे धर्मांतर केले जात होते. यामुळे इतर धर्माच्या लोकांचे जीवन अत्यंत कठीण झाले होते. औरंगजेबच्या अत्याचारांमुळे देशभरात दहशत पसरली होती. त्यावेळी पंडित कृपारामजी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधील ब्राम्हणांच्या शिष्टमंडळाने गुरुजींना भेटून अत्याचारी औरंगजेबापासून संरक्षणाची विनंती केली. कठीण काळात संपूर्ण भारत राष्ट्राचे डोळे गुरु तेगबहादूरजींच्या निर्णयावर खिळले होते मानवतेच्या विवेकाला उंचावण्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला.
श्री गुरु तेग बहादूर साहीबजी यांना आग्रा येथे कैद करून दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली. पण त्यांनी तत्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. २४ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौक येथे औरंगजेबाच्या आदेशानुसार गुरु तेग बहादूर साहिबांनी बलिदान दिले.
गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी वर्षाने न्याय, समता, एकता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या मूल्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केले. त्यांचे बलिदान आजही देशाला धार्मिक सलोखा आणि मानवतेच्या रक्षणासाठी एकत्र उभे राहण्याची शिकवण देते. गुरु तेग बहादूर यांचे जीवन आणि त्याग हे भारतीय संस्कृतीच्या धर्मनिरपेक्षतेचे आणि मानवी मूल्यांचे चिरंजीव प्रतीक आहे गुरुजींचे जीवन आणि संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली.
श्री गुरु तेग बहादूर साहीबजींच्या पाठीमागे केवळ शीख अनुयायी नव्हते; तर त्यांच्या सोबत अनेक समाज उभे होते. विशेषतः सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी आदी समाजांनी या संघर्षात आपले मोलाचे योगदान दिले. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला गुरूजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरुनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात.
श्री गुरु तेग बहादूरजींनी शिकवले की धर्म म्हणजे प्रेम, समता आणि सेवा. ते सांगतात की, धैर्य तलवारीत नसते, ते सत्यात असते. त्यांच्या जीवनाचे खरे ध्येय मानवसेवा हेच होते. धर्म ही मानवतेतील भिंत नसून पूल आहे; श्रद्धा हा संघर्ष नसून सहजीवनाचा प्रवाह आहे. त्यांनी आपल्या बलिदानाने धर्माचे रक्षण म्हणजे इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करण्याचा संदेश जनमानसात पोहोचवला.
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहीबजींच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने (नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड) या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहीबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत राज्यभर प्रचार, प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे संकेतस्थळ आणि गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान झाले. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी असे विविध समुदाय या प्रसंगी एकत्र येऊन हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहीबजींचा संदेश घराघरांत आणि जनमाणसांत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.
श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २१ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर, जानेवारीमध्ये नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
दुसऱ्याच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्याचे उदाहरण जगाच्या इतिहासात नाही. गुरु साहेबांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करूनच या जगात शांती प्रस्थापित होऊ शकते. सत्तेच्या अहंकार आणि दडपशाहीतून कोणीही कधीही विजय मिळवू शकलेले नाही. गुरु साहिब यांचे शहिदी बलिदान आपण तेव्हाच स्वीकारल्यासारखे होईल जेव्हा आपण प्रत्येक धर्मीय व्यक्तीचा सन्मान करू या !…
लेखन : कविता फाले-बोरीकर






