चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 22 एप्रिल : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये जळगावच्या डॉ. नेहा राजपूत यांनी संपूर्ण भारतात 51 वा क्रमांक, तसेच महाराष्ट्रात तिसरा आणि मुलींमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे डॉ. नेहा राजपूत यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशानंतर ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या टीमने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी आपल्या यूपीएससीचा प्रवास उलगडला.
शालेय शिक्षण जळगावातच –
डॉ. नेहा राजपूत यांचे वडील उद्धवसिंग राजपूत यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील सागवन असे आहे. मात्र, नोकरीच्या निमित्ताने ते जळगावला स्थायिक झाले आणि डॉ. नेहा यांचा जन्म हा जळगावातच झाला. यानंतर जळगाव येथेच नेहा यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. नेहा यांनी जळगाव शहरातील सेंट लॉरेन्स हायस्कूल जळगाव याठिकाणी नर्सरी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले. तर जळगाव येथील एम. जे. कॉलेज येथून अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील केईम रुग्णालय याठिकाणी एमबीबीएससाठी प्रवेश घेतला आणि ऑगस्ट 2016 ते 2022 पर्यंत त्यांनी आपला एमबीबीएस पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पदवी सुरू असतानाचा भावाने दिली कल्पना –
मी एमबीबीएस करत असतानाच माझा भाऊ UPSC ची तयारी करत होता. त्यासाठी त्याने स्वतःसाठी काही पुस्तके आणि byjus चेही मार्गदर्शन घेतले होते. मात्र, त्याच्या खाजगी नोकरीमुळे तो नीट तयारी करू शकला नाही आणि शेवटी त्याने परीक्षा दिली नाही, त्यावेळी तेव्हा त्याने मला सांगितले की तू ही परीक्षा देण्याचा विचार कर. हेसुद्धा एक करिअरचं चांगलं ऑप्शन आहे. तु करू शकतेस. मी पण यूपीएससी ऐकलं होतं. मात्र, त्यावेळी मी त्याला इतकं गांभीर्याने घेतलं नाही. कारण माझं एमबीबीएसचं शेवटचं वर्ष असल्याने ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करणं ही माझी प्राथमिकता होती. पण मग मी नंतर कोरोनाकाळात यूपीएससीचा अभ्यासक्रम पाहिला. कशा पद्धतीने काम केलं जातं, या बाबतची सर्व माहिती घेत होते. त्यामुळे मला नंतर त्यात इंटरेस्ट यायला लागला. एकाच वेळी तुम्ही विविध विषय शिकत असल्याने मला त्यात आवड निर्माण झाली. मला हे आव्हानात्मक वाटले. म्हणून मग मी आधी एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण केला. चांगल्या पद्धतीने मी उत्तीर्णही झाली.
डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कार्यातून मिळाली प्रेरणा –
एमबीबीएस करत असताना तिसऱ्या वर्षापर्यंत तर मला सर्जनच बनायचं असं स्वप्न होतं. त्यासाठी मी क्लासेसही सुरू केले होते. मात्र, एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर मे 2021 मध्ये इंटर्नशिप करताना, विचार करत असताना वाटलं की, विविध व्हिडिओ पाहिले. त्याच दरम्यान, डॉ. राजेंद्र भारूड हे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी होते. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केल्याचं पाहिलं. मी ते वाचलं. त्यांनी आपल्या मेडिकल ज्ञान वापरुन प्रशासक म्हणून तिथे अत्यंत चांगलं पद्धतीने काम केले. त्यामुळे त्यांच्या कार्यातून, आपणही यूपीएससी करावी, अशी प्रेरणा मिळाली. यानंतर मी नेमकी ही प्रक्रिया कशी असते, याचीही माहिती घेतली. त्यामुळे मला निदान एक-दोन तरी अटेम्ट द्यावे, अशी चर्चा आई-वडिलांशी केली आणि त्यांनीही होकार दर्शवला.
BYJU’S च्या टॅब्लेट कोर्सची झाली मदत –
BYJU’S च्या टॅब्लेट कोर्सची फ्लेक्झिबिलीटी मला आवडली. सवडीनुसार मी एक कोर्स निवडला. तिथले शिक्षकही मला चांगले वाटलं होते. त्यामुळे मग मी इंटर्नशिप करताना टॅब्लेट कोर्स निवडला. त्या व्हिडिओंच्या माध्यमातून अभ्यास केला. तसेच वर्तमानपत्र वाचायला लागले आणि अशा पद्धतीने बेसिक अभ्यास सुरू केला. मात्र, इंटर्नशिप करताना, मला जास्त वेळ मिळत नव्हता. म्हणून 2022 च्या शेवटापर्यंत म्हणजे इंटर्नशिप संपेपर्यंतही शक्य होईल तितका अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे 2022 चा अटेम्प्टच दिला नाही. पहिला अटेम्प्ट चांगल्या तयारीने देऊया असा विचार म्हणून मग 2023 चा अटेम्प्ट मी तयारी करुन दिला.
ऑगस्ट 2022 पासून मग मी पूर्ववेळ यूपीएससी परिक्षेच्या तयारीला सुरुवात केली. त्यानंतर मे 2023 मध्ये मी पूर्व परीक्षा दिली. त्यामध्ये मी पास झाली. पेपर कठीण होता. मला वाटलं होतं, होऊन जाईल. पण नाही झालं तर दुसरा अटेम्ट देऊया. पण झालं. त्यानंतर मग मी मुख्य परीक्षेसाठी दिल्लीला गेली. तिथे जाऊन मला फायदा होईल, असं मला वाटलं होतं. त्यामुळे त्याठिकाणी मी अडीच महिने राहिले. त्याठिकाणी टेस्ट सीरीज लावल्या आणि व्हिजनचा एक क्रॅश कोर्स केला. तो ऑनलाईन होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मुख्य परीक्षा झाली. पेपर चांगले गेले होते. मात्र, पहिलाच अटेम्प्ट असल्याने जरा शंका होती. त्यामुळे जर झालं नाही तर पुन्हा प्रयत्न करूया, असा विचार होता. दरम्यान, या मुख्य परीक्षेचा निकाल 8 डिसेंबरला निकाल आला. त्यातही मी उत्तीर्ण झाली.
पहिलाच अटेम्प्ट अन् मुलाखतीची तयारी –
मुलाखतीची तयारी कशी केली, याबाबत सांगताना डॉ. नेहा राजपूत म्हणाल्या की, आमचा एक ग्रुप होता. मुख्य परीक्षेसाठी सत्यम जैन यांचा स्पेशल फोकस ग्रुप त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुख्य परीक्षेची तयारी झाली. त्याचप्रमाणे मी मुलाखतीचीही तयारी केली. मुलाखतीसाठी अनेकांनी मार्गदर्शन केले. विशेष करुन वरीष्ठ आयपीएस अधिकारी महेश भागवत सरांची मदत झाली. जे मॉक घेतात त्यांचीही मदत घेतली. यासोबतच युनिक अॅकडॅमी पुणे, चहल अॅकडमी, वाजीराव रेड्डी अॅकडॅमी, केएसजी खान सर, आयएएस अभिषेक दुधळ सर आणि अंकित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीची तयारी केली. या सर्वांनी ज्या-ज्या सुधारणा सांगितल्या त्या सर्व मी केल्या. या सर्व मॉकमुळे माझा आत्मविश्वास वाढला.
निकालाचा तो क्षण अविस्मरणीय –
यानंतर 3 एप्रिल 2024 रोजी माझी मुलाखत झाली आणि 16 एप्रिल रोजी या परिक्षेचा निकाल लागला आणि या मी संपूर्ण देशात 51 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. निकाल लागला, त्या क्षणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ज्या दिवशी निकाल लागला, तो निकाल पाहण्याआधी एक विचार केला होता, जर आपलं झालं नाही तर थोडं रडून घेऊयात आणि पुन्हा प्रयत्न करूयात. इथपर्यंत पोहोचलो आहोत, तर पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे निकालाच्या दिवशी मी निकालाची पीडीएफ डाऊनलोड केली, मी रोल नंबर चेक केला आणि माझी 51 रँक दिसली. पण मला खरंच विश्वास नाही बसला. ही दुसरी तर यादी नाही ना, असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यामुळे मग मी आई आणि वहिणीला सांगितलं की, तुम्ही एकदा परत चेक करा, मला तर असं वाटतंय की दुसरी यादी आहे. त्यामुळे विश्वास बसत नव्हता. पण तोपर्यंत मला कॉलही यायला लागले आणि विश्वास पटला की हो आपण खरंच देशात 51 व्या क्रमांकाने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मला माझ्या या प्रवासात माझे आई वडील, माझे कुटुंबीय आणि माझ्या मित्रपरिवाराचा खूप पाठिंबा मिळाला, असेही त्यांनी सांगितले.
तरुणाईला दिला महत्त्वाचा सल्ला –
एखाद्या व्यक्तीचे यश निश्चितपणे त्याच्या/तिची मेहनत, रणनीतीचे नियोजन आणि प्रयत्नांमधील सातत्य यावर खूप काही असते परंतु नशीब देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर गेल्या आहेत. म्हणून एखाद्या व्यक्तीने फक्त कठोर परिश्रम करणे, स्वतःमध्ये सुधारणा करणे आणि त्यानंतरही तुम्ही अयशस्वी असाल तर या शिकलेल्या गोष्टींचा जीवनात उपयोग करा, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा : ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI