ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 डिसेंबर : पाचोरा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाचोरा आगारातून वडगावकडे निघालेल्या एसटी बसला ट्रॅक्टरने कट मारल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरून खड्ड्यात अडकली. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी व विद्यार्थी होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठा अनर्थ थोडक्यात टळल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाचोरा आगारातून आज 22 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निघालेली एसटी बस (क्रमांक एम.एच. 14 बी.टी. 2611) पाचोरा ते वडगाव मार्गावरून जात असताना मोंढाळे ते निंभोरी गावादरम्यान निंभोरी गावच्या माजी सरपंच मिनाक्षी विनायक दिवटे यांच्या गट क्रमांक 27 नजीक शेताजवळ हा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक कट मारल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरली.
दरम्यान, अपघातात बसचालकाच्या हाताला स्टेअरिंग लागून किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवासी व विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका केली. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी मदतकार्य केले. यावेळी घटनेची माहिती मिळताच पाचोरा आगाराचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व प्रवाशांची विचारपूस केली.
क्रेनच्या सहाय्याने बस रस्त्यावरून बाजूला –
अपघातानंतर सुमारे अर्धा तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पाचोरा–सातगाव (डोंगरी) रस्त्याचे काम सुरू असल्याने साईड पट्टीवर माती साचली असून त्यामुळे बस अधिक घसरल्याची माहिती आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बस रस्त्यावरून बाजूला करण्यात आली.
हेही वाचा : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंची अटक टळली; मात्र, आमदारकी….!; हायकोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?






