मुंबई, 4 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतिक्षा केली जात होती. मात्र, आज ही प्रतिक्षा संपली असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका तसेचन गरपंचायतीच्या निवडणूकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
नगरपालिका-नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर –
राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक इलेक्ट्रीक व्होटिंग मशिन अर्थात EVM वर घेण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

‘असा’ असेल नगरपालिका-नगरपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम –
- नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात – 10 नोव्हेंबर 2025
- नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अंतिम मुदत -17 नोव्हेंबर 2025
- नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया -18 नोव्हेंबर 2025
- नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत (अपिल नसल्यास) – 21 नोव्हेंबर 2025
- नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत (अपिल असल्यास) – 25 नोव्हेंबर 2025
- निवडणूक चिन्ह तसेच निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी – 26 नोव्हेंबर 2025
- मतदानाचा दिवस – 2 डिसेंबर 2025
- मतमोजणीचा दिवस – 3 डिसेंबर 2025
- शासन राजपत्रात निकाल जाहीर करण्याचा दिवस – 10 डिसेंबर 2025
दरम्यान, मतदान जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच नगरपरिषद तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका स्वच्छ, पारदर्शक तसेच कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी राज्य निवडणूक आयोगाने घेतली असल्याचे दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदार यादीनुसार, एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13,355 मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहितीही दिनेश वाघमारे यांनी दिली.
दुबार मतदानासंदर्भात महत्वाची खबरदारी –
मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅपची निर्मिती करण्यात आली असून दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्याच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही, असे डिक्लरेशन घेतले जाईल, अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
आचारसंहितेबाबत काय म्हणाले? –
स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपंचायत तसेच नगरपालिका कार्यक्षेत्रात लागू करण्यात आलेली आहे. यासोबतच ही आचारसंहिता जरी संबंधित नगरपंचायत तसेच नगरपालिका कार्यक्षेत्रात लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही निर्णय अथवा कार्यक्रम झाले आणि ते जर नगरपरिषद-नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला देखील आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत काही उपाययोजना तसेच मदत द्यायची असेल तर त्याला आचारसंहितेची कुठलीही अट नसेल. आचारसंहित आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य निवडणूक आयोगाने आज निर्णय जाहीर केले असल्याची माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली.
31 जानेवारी 2026 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका पार पडतील –
मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका प्रलंबित होत्या. या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका देखील दाखल झाल्या होत्या. मात्र, वेळोवेळी पार पडलेल्या सुनावण्यांनतर 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुर्ण कराव्यात अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर येत्या 31 जानेवारी 2026 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका पार पडतील, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ठ केले.






