जळगाव, 2 फेब्रुवारी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अभ्यासक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्यांना दरवर्षी सुवर्ण पदकाने गौरविण्यात येत असते. विद्यापीठाने नुकताच आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभात एम. ए. मास कम्युनिकेशनमध्ये प्रथम आल्याबद्दल धरती चंद्रकांत चौधरीला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. दरम्यान, मास्टर्सच्या दोन वर्षांच्या या शैक्षणिक प्रवासात मेहनतीने अभ्यास करून शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश संपादित करता आले आणि माझ्या वडिलांची जी शिकवण होती ती मला सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाली, अशा भावना धरती चौधरीने ‘गोल्ड मेडल’ मिळाल्यानंतर व्यक्त केल्या.
धरती चौधरीला मास कम्युनिकेशनमध्ये सुवर्ण पदक –
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांचे दीक्षांत भाषण झाले. दरम्यान, या दीक्षांत समारंभात माध्यमाशास्त्र प्रशाळेची धरती चौधरी या विद्यार्थीनीला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन तिला सन्मानित करण्यात आले. यावेळी तिचे आई-वडील उपस्थित होते.
सुवर्ण पदक मिळवण्याचा बहुमान –
धरती चौधरी ही मूळची भुसावळ येथील असून तिचे वडील हे सामाजिक कार्यकर्ते असून आई गृहिणी आहे तर भाऊ वकील आहे. धरती चौधरी ही 2022-24 या बॅचची माध्यमाशास्त्र प्रशाळेची एम. ए. मास कम्युनिकेशनची विद्यार्थीनी असून दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत तिने प्रथम क्रमांक पटकावला. धरतीने तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे भुसावळातील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे तर जामनेरातील इंदिराबाई ललवाणी महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेतले. तिने नॅचरोपॅथी तसेच मास कम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आणि यानंतर विद्यापीठातील माध्यमाशास्त्र प्रशाळेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुर्ण केले. दरम्यान, हे शिक्षण पुर्ण करत असताना प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण होत धरतीने सुवर्ण पदक मिळवण्याचा बहुमान मिळवला.
पत्रकारितेत येण्याचे सांगितले कारण –
धरती चौधरीने तिला मिळालेल्या यशाबद्दल सांगितले की, माझे वडील नेहमी म्हणतात की, समाजातील तळगळातील सर्वसामान्य माणसांला न्याय मिळवून देण्याची क्षमता लेखणीत असते. आणि म्हणून माझ्या वडिलांच्या विचारांप्रमाणेच मी पत्रकारितेच्या क्षेत्रात आले. तसेच लहानपणापासून सामाजिक सहवास लाभल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाद्वारे आपण समाजाची सत्य बाजू मांडली पाहिजे, याच विचाराने मी पत्रकारितेत वळले. दरम्यान, अनेक अडचणी आल्या तरी तू आता थांबायला नको. ज्या रस्त्यापर्यंत तुला पोहोचायचंय अथवा थेट तुला जिथे पोहोचायच आहे ते ठिकाण आल्याशिवाय थांबायचे नाही, हे आईने सतत मनावर गिरवलं. अशापद्धतीची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली, असल्याचे धरतीने सांगितले.
शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मिळाले यश –
विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तिथल्या वातारवणासोबत मी स्वतःला जुळवून घेईन का याबाबत प्रश्न उपस्थित होते. मात्र, विद्यापीठात रूळल्यानंतर पत्रकारितेच्या अभ्यासात आवड निर्माण झाली आणि शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळाले, असल्याची भावना धरती चौधरीने व्यक्त केली. दरम्यान, माझ्या यशाचे श्रेय मी माझे आई-वडील आणि भाऊ-वहिनी तसेच माझे शिक्षक तथा माध्यमाशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. सुधीर भटकर, सहायक प्रा. डॉ. गोपी सोरडे, प्रा.डॉ. सोमनाथ वडनेरे, सहा.प्रा. रोहित देशमुख, आणि विद्यापीठातील मित्रपरिवाराला देते. यासोबतच प्रा. बबन किरावडकर, प्रा. डॉ. सोपान बोराटे यांचे देखील तिला मार्गदर्शन मिळाले.वडिलांची शिकवण आज सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाली –
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी धरती चौधरीला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. याबाबत बोलताना धरती म्हणाली की, प्रत्येकाने जर आपल्या आयुष्यात असं काही मिळवले तर आपल्या आई-वडिलांसह आपल्याला देखील त्या यशाचा अभिमान वाटतो. आणि त्या दिवशी माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात माझं यश दिसत होतं आणि त्यांचा आनंद बघून मला अभिमानास्पद वाटत होतं. दरम्यान, माझ्या वडिलांची जी शिकवण होती ती मला सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाली, अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.
पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर धरती चौधरी आता पुण्यातील बिझनेसशी निगडित एका कंपनीत कन्टेंट रायटर पदावर कार्यरत आहे. तसेच येणाऱ्या काळात पत्रकारितेशी निगडीत क्षेत्रातच कार्यरत लिखाणाच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळावून देण्याचा मानस राहणार असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, समाजाचे प्रबोधन करण्याचे काम देखील शिक्षणाच्या माध्यमातून केले जाते. यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर त्या ठिकाणी देखील काम करायला आवडेल, असेही धरती म्हणाली.
चांगल्या मार्गदर्शकाची निवड गरजेची –
सध्याच्या स्थितीतील आजच्या तरूणांमध्ये मोबाईल वापराचे प्रमाण वाढले आहे. मात्र, भावनेच्या ओघात वाहून न जाता आपले ध्येय निर्धारित करून आपल्या कृतीतील चांगल्या-वाईट परिणामांची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्यासाठी काय योग्य आणि अयोग्य याची ओळख करून योग्य बाबींचा अवलंब केला पाहिजे. यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची निवड केली पाहिजे, असे मत युवक-युवतींना मार्गदर्शन करताना धरती चौधरीने व्यक्त केले.
हेही वाचा : ‘मुंबई लोकलमध्ये असताना आला पद्मश्री पुरस्काराबाबतचा तो कॉल’, वनसंवर्धक चैत्राम पवार विशेष मुलाखत