मुंबई : आम्ही सर्वजण हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे पालन करणारी लोकं आहोत. आमच्या इथे पुण्य-पाप याबाबत सांगितले गेले आहे. सर्वात मोठा घात गौघात आहे. पण त्यापेक्षाही मोठा घात हा विश्वासघात आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे आणि याबाबत अनेकांच्या मनात दु:ख आहे, असे परखड मत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरुन शंकराचार्यांनी काल सोमवारी मातोश्रीवर भेट दिली. यावेळी झालेल्या पूजाविधीदरम्यान, उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मातोश्रीवरील भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही शिवसेनेतील पक्षफूटीवर आपले मत व्यक्त केले.
नेमकं काय म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद –
माध्यमांशी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, आज आम्ही इथे उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणावरुन आलो. त्यांनी स्वागत केले. आम्ही त्यांना बोललो की, तुमच्यासोबत विश्वासघात झाला याबाबत आमच्या सर्वांच्या मनात दु:ख आहे. जोपर्यंत पुन्हा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत नाहीत, तोपर्यंत आमच्या मनातील दु:ख दूर होणार नाही.
जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही –
जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू आहे, कारण त्याच्यासोबत विश्वासघात झाला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात, असा सवालही त्यांनी शिंदे गटाचे नाव न घेता केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात याबाबत दु:ख आहे. निवडणुकीत हे दिसूनही आले. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला आहे, हे आता महाराष्ट्राची जनतेने स्विकारले आहे, यावरुन हे दिसते. त्यामुळे हा जनतेचा अनादर आहे. जनता ज्याला बहुमत देते, त्याला टिकवून ठेवले पाहिजे. मध्येच सरकार पाडणं, जनमताचा अनादर करणे हे योग्य नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केला.
जे योग्य असेल, तेच बोलणार –
शंकराचार्य जे योग्य असेल, तेच बोलतील. आम्हाला राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही. मात्र, आपल्या इथे विश्वासघात पाप सांगितले गेले आहे. याबाबत कोण बोलणार, धर्माचार्य यांनाच याबाबत बोलावे लागणार ना, असेही त्यांनी स्पष्ट केले.