चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
साखरे (धरणगाव), 6 ऑगस्ट : स्वप्नांची पुर्तता करत असताना वारंवार मिळत असलेल्या अपयशाने खचून न जाता आपल्या प्रामाणिक कष्टांवर विश्वास ठेवत केलेल्या प्रयत्नांमुळे नक्कीच यशाचे शिखर गाठता येते, हे स्वप्निल पाटील या तरूणाने सिद्ध करून दाखवलंय. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साखरे गावातील शेतकरी पुत्र स्वप्निलची महाराष्ट्र लोकसेवा आयोग-2022 च्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (PSI) निवड झाली आहे. दरम्यान, स्वप्निलने मिळवलेल्या यशाबद्दल सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या टीमने त्याच्यासोबत विशेष संवाद साधला.
स्वप्निलची पीएसआय पदी निवड –
महाराष्ट्र लोकसेवा आयोग-2022 च्या पीएसआय पदाच्या निवडीसाठी नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक तरूणांनी मोठ्या मेहनतीने यश मिळवत पीएसआय होण्याचं स्वप्न पुर्ण केलंय. यामध्ये धरणगाव तालुक्यातील साखरे येथील स्वप्निलने दिनकर पाटील या तरूणाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (PSI) निवड झाली आहे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या यशामुळे त्याने आपलं यश संपादन केलंय.
कोण आहे स्वप्निल पाटील? –
स्वप्निल धरणगाव तालुक्यीतल साखरे गावाचा रहिवासी आहे. त्याचे वडील हे एक निवृत्त पोस्टमन असून सध्या ते शेती करतात. तर आई गृहिणी आहे. तसेच त्याचा मोठा भाऊ सुदर्शन दिनकर पाटील हे जळगावला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. स्वप्निलचे माध्यमिक शिक्षण हे साखरे येथून झाले तर एएससी कॉलेज चोपडा येथून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर पीएसआय व्हावे, असे ध्येय मनात असताना आधी उच्च शिक्षण घ्यावे, अशी इच्छा होती. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून फिजिक्स या विषयात मास्टर्स पुर्ण केले. यानंतर जळगावात राहून 2019 सालापासून स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासास सुरूवात केली. अभ्यासाला सुरूवात केल्यानंतर पीएसआयपदी निवड होण्यापुर्वी त्याला अनेक अपयशांचा सामना करावा लागला.
पीएसआय पदी निवड झाल्यापर्यंतचा प्रवास –
स्वप्निल पाटीलने महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2022 च्या पीएसआय पदाची जाहिरात निघाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. यामध्ये पुर्व परिक्षेत 55 गुण मिळवले. तर छत्रपती संभाजीनगरात राहून मुख्य परिक्षेची तयारी करत 292 गुण प्राप्त केले. दरम्यान, शारिरीक चाचणीसाठी जळगावात येऊन तयारी केली आणि त्यासाठी मी पात्र ठरून मुलाखतीपर्यंत पोहचला. पीएसआय पदासाठी निवड होण्याकरिता त्याचा अंतिम टप्प्याचा प्रवास सुरू झाला आणि त्याने मुलाखतीत 24 गुण मिळवले. दरम्यान, मुख्य परिक्षा आणि मुलाखत मिळून एकत्रितपणे 400 पैकी 316 गुण मिळवत स्वप्निलने पीएसआय पदाला गवसणी घातली.
दरम्यान, पीएसआय पदासाठी निवड झाल्यापुर्वीचा प्रवास हा चढ-उताराचा राहिलाय. यामध्ये अनेकवेळा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये परिवारासह मित्रांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. असल्याचे स्वप्निलने सांगितले.
पीएसआय पदी निवड झाल्यानंतर काय पहिली भावना होती?
स्वप्निलने सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना पीएसआय पदी निवड झाल्यानंतरच्या भावनेबाबात बोलताना सांगितले की, प्रामाणिक कष्टावर माझा विश्वास होता आणि प्रामाणिकपणे आपण कष्ट केले तर आपल्याला एकेदिवशी फळ नक्कीच मिळते, हे माझ्या निवडीतून दिसून आले. माझी पीएसआय पदासाठी निवड होईल, असा मला माझ्यावर पुर्णपणे विश्वास होता. दरम्यान, निकालाची प्रतिक्षा करत असताना ज्यावेळी गुणवत्ता यादी जाहीर त्यामध्ये माझ्यासह मित्राच्या नावाचा समावेश होता. यानंतर माझ्या वडिलांना पहिलाच कॉल केला आणि पीएसआय पदी निवड झाल्याचे सांगितले. मी पीएसआय व्हावे, अशी माझ्या वडिलांची मनापासूनची इच्छा होती. अखेर, ते स्वप्न सत्यात उतरल्यानंतर वडीलांना देखील आनंदाश्रू अनावर झाले. त्यावेळी माझे यश शब्दात व्यक्त करू शकत नाही, असा तो खूप भावनिक क्षण होता.
यशाचे श्रेय कुणाला? –
स्वप्निल सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना पुढे म्हणाला की, माझ्या परिवाराने माझ्यावर विश्वास दाखवत मला आर्थिक सहकार्य केले. यामुळे माझ्या यशाचे श्रेय सर्वात आधी माझ्या आई-वडील आणि शिक्षक भावाला देऊ इच्छितो. साखरे गावातील बालपणीचे गुरू जयदीप निंबाजी पाटील यांच्यासह संपुर्ण प्रवासात मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळे त्यांचे माझ्या यशात योगदान आहे. दरम्यान, माझे वजन जास्त असल्याने मला शारिरिक चाचणीसाठी अडचणी निर्माण झाल्या. यासाठी जळगावातील पठाडे सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी पीएसआय पदासाठीची शारिरिक चाचणी पात्र करू शकलो. यामुळे पठाडे सर यांनी माझ्या यशात मोठी कामगिरी केली असल्याचेही स्वप्निलने सांगितले.
तरूणांना सल्ला –
स्मार्ट वर्कसह कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. आपण जेवढे कष्ट घेतो, त्याचे फळ एमपीएससीद्वारे एकदिवशी नक्कीच मिळते. जो प्रामाणिक प्रयत्न करून संयमाने लढतो, त्याला नक्की यश मिळते, असा सल्ला स्वप्निल पाटीलने स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांना दिला.
हेही वाचा : 11 महिन्यांचा असताना वडिलांचं निधन, मामाकडे राहून शिकला अन् पारोळ्याचा प्रफुल झाला PSI, प्रेरणादायी स्टोरी