धडगाव (नंदुरबार), 28 ऑक्टोबर : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरातील वाढती लोकसंख्या तसेच वाहन सुद्धा खूपच वाढले असल्याचे दिसून येत आहेत. तसेच वन वे असल्याने बाजारात पायी चालणाऱ्यांना सुद्धा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक दुचाकी वाहन धारक सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र याठिकाणी पाहायला मिळत आहे.
या प्रकाराने धडगाव तालुक्यात बऱ्याच घटना घडायला लागल्या आहेत. त्यात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत असून त्यांचा परिवार उघड्यावर पडत आहेत. त्यामुळे वेगाने चालवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहेत. या पार्श्वभूमीवर धडगाव शहरातील अतिवेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्याकडून धडगावचे पोलीस निरीक्षक आय. एन. पठाण यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंबधीचे निवेदन आज पोलीस निरीक्षक आय. एन. पठाण यांना संजय काकड्या पराडके (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ – मुख्य प्रचार प्रमुख धडगाव तालुका) आणि उदेसिंग तेजला पराडके (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ – प्रचार संघटक धडगाव तालुका) यांनी दिले.