मुंबई, 27 जून : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची भूमिका हाती घेतली असून ते दोघेही येत्या 5 जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात एकत्र सहभागी होणार आहेत. याबाबतचमी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे त्यांनी एक्सवर पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल्यानं राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांची एक्स पोस्ट –
खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठीत ट्विट केले होते. त्यानंतर लगेच संजय राऊतांनी इंग्रजीत दुसरे ट्विट केलंय. जय महाराष्ट्र म्हणत, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हे ब्रँड आहेत, असं त्यांनी ‘या’ पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच या पोस्टमध्ये थेट केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊतांनी टॅग केलंय.
खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले? –
माध्यमांसोबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मला राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांची भूमिका सांगितली. मराठी माणसाचे दोन मोर्चे निघणे बरे दिसत नाही आणि म्हणून एकत्र आंदोलन झाले तर प्रभाव पडेल, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. मी यानंतर मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना राज ठाकरे जे काही बोलले ते सांगितले. यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठीचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. म्हणून त्यानंतर दोघांनाही एकत्र मोर्चा काढण्याचे ठरवलं. दरम्यान, दोघांचा मोर्चा 5 तारखेला निघणार असून सकाळी 10 ची वेळ योग्य नाही आम्ही याबाबत चर्चा करू…वेळेच्या बाबतीत काही चर्चा करू, अशी माहिती संजय राऊतांनी मांडलीय.
मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार –
हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले असून राज ठाकरे पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गाराची घोषणा करण्यात आली होती. मात्र, हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्रित एकच मोर्चा काढावा, यासाठी प्रयत्न सुरु होते. अशातच आज राज्यसभा खासदार संजय राऊतांनी मोठी घोषणा करत येत्या 5 जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा : मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे