ठाणे, 10 जून : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनच्या अपघाताची धक्कादायक घटना काल 9 जून रोजी घडली. कसऱ्याहून मुंबई सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी आणि सीएसएमटीवरून कल्याणच्या दिशेनं जाणारी लोक एकमेकांना क्रॉस करत असताना हा लोकल ट्रेन अपघाताची दुर्दैवी घटना घडली. यावेळी दोन्ही लोकलमध्ये दरवाज्यावर उभे असणारे प्रवासी एकमेकांना घासले गेले आणि एकूण 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून ठाणे येथे लोहमार्ग पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या विकी बाबासाहेब मुख्यादल (वय 33) यांचा यामध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी मुख्यादल हे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचा रहिवासी होते. सध्या ते कल्याण पुर्वमधील लोकग्राम सोसायटीत वास्तव्यास होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे ते कर्तव्यावर जायला निघाले असताना काल 9 जून रोजी मुंबईतील मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेन अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विकीच्या घरावर कोसळला दु:खाचा डोंगर –
ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यातून विकी यांच्या पत्नी दीपाला फोनवरून कळवा रुग्णालयात येण्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेजाऱ्यांसोबत त्या रुग्णालयात गेल्या असतापांढऱ्या कापडात गुंडाळलेला पतीचा मृतदेह पाहताच त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. तर दुसरीकडे विकी यांचा तीन वर्षीय मुलगा प्रणय याचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता. मात्र, मुलाच्या वाढदिवसापूर्वीचा वडिलांचा मृ्त्यू झाल्यानं संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.