जळगाव, 26 डिसेंबर : महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा 6 डिसेंबर 1946 हा स्थापना दिवस असून, त्या अनुषंगाने महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार दि. 7 ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हाभरात स्थापना दिन सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, स्थापना दिन सप्ताहाच्या समारोपानिमित्त आज शुक्रवार 26 डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालय, जळगाव येथील कवायत मैदानावर भव्य संचलन परेडचे आयोजन करण्यात आले. या परेडची मानवंदना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी रोहन घुगे व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारली.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी होमगार्डच्या सामाजिक व आपत्कालीन सेवांतील योगदानाचा गौरव करत, होमगार्डसाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली. तर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी होमगार्ड हा पोलीस विभागाचा महत्त्वाचा घटक असून प्रत्येक जबाबदारीत ते प्रामाणिकपणे सहभागी होत असल्याचे नमूद केले.
तसेच होमगार्ड जवानांना प्रेरणा देण्यासाठी प्रशस्तीपत्रकाद्वारे सन्मान केला जात असल्याचे सांगत आगामी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या संचलन परेडमध्ये होमगार्ड दलाचे तीन व पोलीस विभागाचे तीन अशा एकूण सहा प्लाटून सहभागी झाले होते. परेड कमांडर म्हणून रवींद्र ठाकूर, वरिष्ठ पलटन नायक, जळगाव यांनी नेतृत्व केले, तर सहाय्यक म्हणून विजय जावरे, वरिष्ठ पलटन नायक, यावल यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी गणापुरे, समादेशक अधिकारी संजय पाटील यांच्यासह एरंडोल, धरणगाव, वरणगाव, जामनेर, रावेर, यावल, पारोळा, अमळनेर आदी तालुक्यांचे समादेशक अधिकारी व मोठ्या संख्येने होमगार्ड जवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नखाते यांनी केले, तर सूत्रसंचालन मदन रावते, पलटन नायक, जळगाव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव पथकातील अधिकारी व होमगार्ड जवानांनी स्वयंस्फूर्तीने परिश्रम घेतले.
महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचा स्थापना दिन सप्ताहादरम्यान तालुका पथकनिहाय वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळवाटप, गरजूंना कांबळेवाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच जळगाव शहरातील विविध शाळांमध्ये अग्निशमन व आपत्ती विमोचनाची प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीजन्य परिस्थितीबाबत जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, जळगाव, सावदा, भुसावळ, भडगाव व अमळनेर येथील अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक, होमगार्ड, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली होमगार्ड तिमाही संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी होमगार्ड जवानांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली.






